सिडको एक्झिबिशनमध्ये ३० आयसीयू व १० व्हेंटिलेटर्स सुरु; आयसीयु सुविधेची पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पाहणी

नवी मुंबई मपालिका क्षेत्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन गंभीर स्वरूपाच्या रूग्णांसाठी आयसीयु बेड्स वेळेत उपलब्ध व्हावा याची नवी मुंबई महानगरपालिका खबरदारी घेत आहे. महानगरपालिकेने आपल्या आयसीयु बेड्सची संख्या वाढवत ३७५ इतकी तसेच शहरातील ऑक्सिजन बेड्सची संख्याही ३ हजार पर्यंत नेलेली आहे.

    नवी मुंबई : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करताना वाढती रूग्णसंख्या नजरेसमोर ठेऊन रुग्णालयीन सुविधा वाढीवर भर दिला जात असून प्रामुख्याने जाणवणारी आयसीयु बेड्स व व्हेटिलेटर्सची गरज सोडविण्याच्या दृष्टीने गतीमान प्रयत्न केले जात आहेत. त्याच अनुषंगाने विस्तारित सिडको एक्झिबिशन सेंटर येथे ७५ आयसीयु बेड्स व ३० व्हेंटिलेटर्सची सुविधा निर्माण करण्यात आलेली आहे. त्यामध्ये पहिल्या टप्प्यात ३० आयसीयू बेड्स व १० व्हेंटिलेटर्सची सुविधा सुरू करण्यात आलेली असून आज ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सुविधेची पाहणी केली व समाधान व्यक्त केले. याप्रसंगी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त संजय काकडे, सिडको सेंटरचे नोडल अधिकारी निलेश नलावडे व इतर अधिकारी उपस्थित होते.

    नवी मुंबई मपालिका क्षेत्रातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन गंभीर स्वरूपाच्या रूग्णांसाठी आयसीयु बेड्स वेळेत उपलब्ध व्हावा याची नवी मुंबई महानगरपालिका खबरदारी घेत आहे. महानगरपालिकेने आपल्या आयसीयु बेड्सची संख्या वाढवत ३७५ इतकी तसेच शहरातील ऑक्सिजन बेड्सची संख्याही ३ हजार पर्यंत नेलेली आहे. यामधून रूग्णांना वेळेत बेड्स उपलब्ध होईल याची खबरदारी घेत असल्याबद्दल पालकमंत्री शिंदे यांनी महापालिका आयुक्त बांगर आणि त्यांच्या टिमच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले. सध्या राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असून नवी मुंबई महानगरपालिकेने त्यादृष्टीने तत्पर कार्यवाही करीत पोर्टेबल ऑक्सिजन जनरेटर प्लान्ट उभारण्याचा निर्णय घेऊन प्रक्रियेला सुरूवात केली असून त्यामधून महानगरपालिकेची कोविड सेंटर्स स्वयंपूर्ण होतील असा विश्वास पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.

    ७५ पैकी ३० आयसीयु सुरु

    सिडको एक्झिबिशन सेंटर येथे महानगरपालिकेचे १,२०० ऑक्सिजन बेड्स क्षमतेचे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर कार्यान्वित असून सध्याची वाढती रूग्णसंख्या लक्षात घेता त्याच्या बाजूच्या भागात ३०० बेड्स क्षमतेचे कोविड केअर सेंटर कार्यान्वित करण्यात आलेले आहे. याठिकाणी ऑक्सिजन बेडवर उपचार घेणाऱ्या रुग्णास आयसीयू सुविधेची गरज भासली तर त्याच्या नजीक आयसीयु सुविधा असावी यादृष्टीने सेंटरच्या शेजारीच विस्तारित स्वतंत्र भागात ७५ आयसीयु बेड्सची सुविधा कार्यान्वित करण्यात येत असून त्याच्या पहिल्या टप्प्यात ३० आयसीयु बेड्ससह १० व्हेंटिलेटर्स सुविधा सुरू करण्यात आलेली आहे.