भिवंडीत एकाच दिवसात ३३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू ; तर ६५ नवे रुग्ण आढळले

भिवंडी : भिवंडीत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गुरुवारी शहरात एकाच दिवसात कोरोनाने तब्बल ३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर ४० नवे रुग्ण आढळले आहेत. तर ग्रामीण भागात २५ नवे रुग्ण आढळले असून

भिवंडी : भिवंडीत कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून गुरुवारी शहरात एकाच दिवसात कोरोनाने तब्बल ३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर ४० नवे रुग्ण आढळले आहेत. तर ग्रामीण भागात २५ नवे रुग्ण आढळले असून शहर व ग्रामीण भागात एकूण ६५ नवे रुग्ण आज आढळले आहेत. वाढत्या नव्या रुग्णांमुळे भिवंडीतील कोरोनाबाधितांच्या आकड्याने एक हजारांचा टप्पा ओलांडला असल्याने भिवंडीकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. तर वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी गुरुवार पासून मनपाने पंधरा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र लॉकडाऊन बरोबरच रुग्णांना योग्य त्या सुविधा मिळत नसल्याने शहरात रुग्णांच्या मृत्यू संख्येय वाढ होत असल्याचा आरोप मनपा प्रशासनावर करण्यात येत आहे. 

भिवंडी शहरात आतापर्यंत ७२७ रुग्ण आढळले असून त्यापैकी २७२ रुग्ण बरे झाले आहेत तर ५८ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून ३९७ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर ग्रामीण भागात आतापर्यंत ३२१ रुग्ण आढळले असून त्यापैकी ११६ रुग्ण बरे झाले आहेत तर ५ रुग्णांचा मृत्यू झाला असून २०० रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. दरम्यान गुरुवारी आढळलेल्या ६५ नव्या रुग्णांमुळे भिवंडीतील शहर व ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांचा एकूण आकडा १०४८ वर पोहचला असून त्यापैकी 388 रुग्ण बरे झाले आहेत तर ६३ रुग्णांचा मृत्यू झाला असून ५९७ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत.

शहरातील वाढत्या कोरोनाबाधितांचा आकडा नियंत्रणात आणण्यात मनपा प्रशासनाला अपयश आले असून गुरुवार पासून पंधरा दिवसांचा लॉकडाऊन मनपाने घोषीत केला आहे. मात्र मनपाच्या अखत्यारीत असलेल्या कोविड रुग्णालयात रुग्णांवर योग्य उपचार होत नसल्याने कोरोनाबाधीत रुग्णाचा मोठ्या प्रमाणात मृत्यू होत असल्याचा आरोप एमआयएमचे शहराध्यक्ष खालिद गुड्डू यांनी केली आहे.