भिवंडीत कसायाने चोरून आणलेल्या २ गाई आणि २ वासरांची कत्तलीपासून सुटका

भिवंडी: शहरातील आसबीबी रोडवरील रुगठा डाईंग कंपनीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या एका कसाईच्या घरात दोन दुभत्या गाई व दोन वासरे अशी चार गोवंश जनावरे कत्तलीसाठी डांबून ठेवल्याची खबर शहर पोलिसांना

 भिवंडी: शहरातील आसबीबी रोडवरील रुगठा डाईंग कंपनीच्या पाठीमागील बाजूस असलेल्या एका कसाईच्या घरात दोन दुभत्या गाई व दोन वासरे अशी चार गोवंश जनावरे कत्तलीसाठी डांबून ठेवल्याची खबर शहर पोलिसांना मिळाली. भिवंडी शहर पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन गाई व वासरांची सुटका करून या चारही जनावरांची कत्तलीतून सुटका केली आहे.या गाई व वासरांना सुरक्षिततेसाठी अनगांव येथील गोशाळेत रवाना करण्यात आले आहे. या प्रकरणी बाबू हाजी शाहमोहमद कुरेशी,नायाबअली शाहमोहमद कुरेशी व त्यांचे अन्य दोन साथीदारांवर पशुधन चोरी व गोवंश कत्तलप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा दाखल केला आहे.यावेळी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत चारही कसाई फरार झाले आहेत.या चौघांनी संगनमत करून दुभत्या गाई व वासरे कोठुनतरी चोरून आणून त्यांची टेम्पोतून क्रुरतेने वाहतूक करून ती गोवंश हत्या करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवल्याचे पोलिसांना आढळून आल्याने फौजदारी कारवाई करण्यात आली आहे.यावेळी घटनास्थळावरून  पोलिसांनी १ लाख ५० हजार रुपये किंमतीचा एक टेम्पो,१ लाख रुपये किंमतीची बुलेट मोटारसायकल,४० हजार रुपये किंमतीची जर्सी जातीची जिवंत गाय,३० हजार रुपये किंमतीची गीर जातीची जिवंत गाय,४ हजार रुपये किमतीचे २ जिवंत वासरू,१०० रुपये किमतीचा सत्तुर,२०० रुपये किमतीचा लोखंडी हुक,७० रुपये किमतीचा स्टीलचा सुरा असा एकूण ३ लाख २४ हजार ४२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.या पशुधन चोरीच्या घटनेचा पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक दिपेश किणी करीत आहेत.