परराज्यातून रेल्वेने ठाण्यात आलेल्या ४४८ जणांना कोरोनाची लागण, एसटीने प्रवास करणाऱ्यांची होत नाही चाचणी ?

ठाणे(thane) शहरात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी पालिका योग्य ती खबरदारी घेत आहे.  कोरोना चाचण्यांचे प्रमाण शहरात वाढवण्यात आले आहे. अशातच परराज्यातून ठाण्यात आलेले ४४८ प्रवासी कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती समोर आली आहे.

ठाणे : ठाणे(thane) शहरात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी पालिका योग्य खबरदारी घेत आहे.  कोरोना चाचण्यांचे प्रमाण शहरात वाढवण्यात आले आहे. परराज्यातून रेल्वेने ठाण्यात येणाऱ्यांचीही देखरेख सुरु आहे. चाचणी सुरु आहे. यात ४४८ प्रवाशांना कोरोनाची(corona)लागण  झाल्याची माहिती  मिळाली आहे. मात्र एसटीने किती कोरोना रुग्ण ठाण्यात आले, त्याची माहिती मिळाली नाही.

ठाणे शहरात मार्च महिन्यापासून कोरोनाचा शिरकाव झाला. तेव्हापासून ज्या प्रभागात, विभागात, गल्लीमध्ये रुग्ण आढळून येत आहे. त्या ठिकाणी संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण करणे, धूर फवारणी करणे आदी उपाययोजना महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्यात एप्रिल ते सप्टेंबर या काळात आढळून येणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत ऑक्टोबरपासून घट होत असल्याचे दिसत आहे. रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यात पालिका प्रशासनाला यश आले.

टाळेबंदी शिथिल आल्यानंतर परराज्यातून येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे पुन्हा शहरात कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका लक्षात घेता, परराज्यातून रेल्वेने येणाऱ्या नागरिकांवर देखरेख करण्यासाठी आणि त्यांची त्याच ठिकाणी चाचणी करण्याच्या दृष्टीने महापालिकेने ३० ऑगस्टपासून दिवसाची आणि ५ नोव्हेंबरपासून रात्रीची कोरोना चाचणी केंद्रे रेल्वे स्टेशन परिसरात सुरु केली. त्यानुसार आतापर्यंत ठाण्यात रेल्वेनं परराज्यातून ४४८ कोरोना रुग्ण आलेत. त्यामुळे कोरोनाला अटकाव करण्यात पालिकेने काहीसे यश मिळविले आहे.

दिवसाच्या सत्रात ३० ऑगस्टपासून आतापर्यंत ८९ हजार ५४ जणांची चाचणी करण्यात आली आहे. त्यातील ३८६ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे तर, ५ नोव्हेंबरपासून आतापर्यंत रात्रीच्या सत्रात सुरु करण्यात आलेल्या १० हजार  ९०२जणांच्या चाचणीत ६२ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती पालिकेने दिली आहे. त्यानुसार आता या दोन्ही सत्रात करण्यात आलेल्या ९९ हजार ९५६ चाचण्यांमध्ये ४४८ जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान ठाणे शहरात राज्यातील विविध भागातून एसटी आणि खासगी बसेसमधून देखील मोठ्या प्रमाणात प्रवासी रोजच्या रोज येत आहेत. त्यात ठाणे स्टेशन, वंदना एसटी डेपो आणि खोपट डेपो येथून रोज शेकडो प्रवासी ये जा करताहेत. मात्र बाहेरून येणाऱ्या एकाही प्रवाशाची कोरोना चाचणी किंवा अँटीजेन टेस्ट केली जात नसल्याची बाब समोर आली आहे.