
गेल्या ८ दिवसांपासून हवामानातील बदलामुळे(climate change) कडाक्याची थंडी पडल्याने सर्वांनाच गरम ऊब हवी आहे. मुक्या प्राण्यांनाही या ऊबेची आवश्यकता असल्याने विषारी – बिन विषारी साप मानवीवस्तीत शिरल्याच्या घटनेवरून दिसून आले आहे.
कल्याण : गेल्या ८ दिवसांपासून हवामानातील बदलामुळे कडाक्याची थंडी पडल्याने सर्वांनाच गरम ऊब हवी आहे. मुक्या प्राण्यांनाही या ऊबेची आवश्यकता असल्याने विषारी – बिन विषारी साप मानवीवस्तीत शिरल्याच्या घटनेवरून दिसून आले आहे.(snakes in kalyan) विशेष म्हणजे एकाच दिवसात कल्याण पश्चिमेकडील परिसरातील मानवी वस्तीतून ४ तर कल्याणच्या रेल्वे लोको शेडमधून १ असे ५ विषारी – बिन विषारी साप सर्पमित्रांनी पकडले आणि त्यांना निसर्गाच्या सानिध्यात सोडून जीवदान दिले आहे.
नवीन कल्याण म्हणून ओळख निर्माण झालेल्या पश्चिमेकडील खडकपाडा परिसरात मोठमोठी गृह संकुले जंगल, शेती नष्ट करून उभारली जात आहे. त्यातच जिल्ह्यात अचानक वातावरण बदलल्याने बिळातून विषारी – बिन विषारी साप भक्ष्य शोधण्यासाठी व थंडीपासून बचावासाठी मानवी वस्तीत शिरत असल्याच्या घटना घडत असतानाच खडकपाडा परिसरात असलेल्या नीलकंठ पार्क सोसायटीतील एक रहिवाशी काल सकाळच्या सुमारास आपली दुचाकी काढण्यासाठी पार्किंगमध्ये गेला असता भलामोठा साप सोसायटीच्या आवारात शिरल्याची माहिती त्याने सर्पमित्र दत्ता बोबें यांना दिली. सर्पमित्र दत्ता यांनी या सापाला पकडून पिशवीत बंद केल्याने रहिवाशांनी सुटकेचा निश्वास घेतला. हा साप धामण जातीचा असून बिन विषारी आहे.
दुसऱ्या घटनेत कोळीवली गावात एका घराच्या पडवीत विषारी साप शिरल्याची माहिती सर्पमित्र दत्ता बोबे यांना दिली. त्यानंतर बोंबे यांनी काही वेळातच घटनास्थळी येऊन या विषारी सापाला पकडले. हा साप ५ फूट लांबीचा असून अत्यंत विषारी अशा घोणस जातीचा आहे. तिसऱ्या घटनेत कल्याण रेल्वे लोकोशेड मध्ये विषारी साप शिरल्याची माहिती मिळताच सर्पमित्र दत्ता यांनी काही वेळातच घटनास्थळी येऊन या विषारी सापाला पकडले. हा साप ४ फूट लांबीचा असून अत्यंत विषारी अशा घोणस जातीचा आहे.
चौथ्या घटनेत कल्याण पश्चिमेकडील एका बांधकाम सुरु असलेल्या साईटवर खोदकाम करताना मजुराला भलामोठा साप अर्धवट मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेला दिसला. त्याने याची माहिती मालकाला दिली. त्यांनतर मालक भोईर यांनी सर्पमित्र दत्ता बोबे यांना दिली. काही वेळातच बोंबे यांनी घटनास्थळी येऊन या सापाला पकडले. हा साप ६ फूट लांबीचा असून धामण जातीचा आहे. पाचव्या घटनेत मैत्रीकुल आश्रमच्या एका पुस्तकाच्या कपाटात आश्रमातील विध्यार्थी पुस्तक घेण्यसाठी गेला असता त्याला भलामोठा साप कपाटात दडून बसल्याचे दिसला. त्याने या घटनेची माहिती आश्रमातील इतर विध्यार्थाना दिली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता. त्यांनतर घटनेची माहिती सर्पमित्र दत्ता यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जाऊन कपाटात दडून बसलेल्या साडे सहा फुटाच्या सापाला बाहेर काढले. साप पकडल्याचे पाहून विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास घेतला हा साप धामण जातीचा आहे.
या पाचही विषारी-बिन विषारी सापांना वन विभागाच्या अधिकाऱ्याची परवानगी घेवून जंगलात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास निर्सगाच्या सानिध्यात सोडल्याची माहिती सर्पमित्र दत्ता बोंबे यांनी दिली. हवामानात बदल झाल्याने साप भक्ष्य व उब मिळावी म्हणून बिळातून बाहेर येऊन मानवीवस्तीत शिरत असल्याचे सर्पमित्रांचे म्हणणे असून कुठेही मानवीवस्तीत साप दिसल्यास वॉर संस्थेच्या सर्पमित्रांना याची माहिती तत्काळ देण्याचे आवाहन केले आहे.