केडीएमसी कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू ; फटाके फोडत कर्मचाऱ्यांनी केला जल्लोष

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन (7th Pay Commission ) आयोग लागू व्हावा यासाठी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरु होता.

कल्याण : कल्याण-डोंबिवली (KDMC Employees) महानगरपालिका कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग मंजूर झाला असून या मंजुरी नंतर महापालिका मुख्यालयात म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्यावतीने फटाके फोडत जल्लोष करण्यात आला. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन (7th Pay Commission ) आयोग लागू व्हावा यासाठी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरु होता.

सर्व पदाधिकारी, कर्मचारी, अधिकारी यांच्या अथक परिश्रमाला यश मिळाले असून शिवसेना नेते, नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री ठाणे एकनाथ शिंदे यांच्यामुळे शासन दरबारी सातवा वेतन आयोग मंजूर झाला आहे. यामुळे सुमारे ६५०० कर्मचारी-अधिकारी यांना याचा लाभ मिळणार आहे. म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेसाठी हे खूप मोठं यश असून सेवाषर्ती अधिनियम व आकृती बंध हे पुढील काही दिवसात मार्गी लागणार असल्याची माहिती म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे उपाध्यक्ष रवी पाटील यांनी दिली.

तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे महापालिकेने कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू केला असून, यासाठी गेल्या तीन वर्षांपासून पाठपुरावा करत होतो. याबाबत आयुक्तांच्या बैठकीत त्यांनी पालिकेकडे पैसे नसल्याचे सांगितले होते. मात्र सातवा वेतन आयोग हा आज ना उद्या कर्मचाऱ्यांना द्यावा लागणारच असल्याचे पटवून दिल्यानंतर आयुक्तांनी याला मंजुरी दिली असल्याची माहिती म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे नवनिर्वाचित सरचिटणीस प्रकाश पेणकर यांनी दिली. यावेळी उपाध्यक्ष सुनील पवार, कार्याध्यक्ष अजय पवार, किसन गावरी, संजय भालेराव, मुकुंद गरुड, संजय बडाते, धर्मेंद्र गोसावी व अवधूत मदन उपस्थित होते.