पोहण्यासाठी गेलेल्या १६ वर्षीय तरुणाचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू, दिवा आगासन गावावर पसरली शोककळा

ठाणे (Thane).  दिवा आगासन गावात राहणारा अवघा १६ वर्षांचा आर्यन चिपी नामक मुलगा रविवारची सुट्टी घालविण्यासाठी गावाजवळच असलेल्या तलावात पोहण्यासाठी गेला होता. सायंकाळी चारची वेळ असल्याने जवळपास कोणीही नव्हते. पाण्यात उतरून तो पोहण्याची गेला; परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने काही वेळातच तो गटांगळ्या खाऊ लागला. त्यानंतर काही वेळातच त्याने पाण्याचा तळ गाठला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ठाण्यातील दिवा आगासन गावातील ही घटना असून आर्यनच्या अशा अकाली जाण्याने तो रहात असलेल्या संपूर्ण परिसरावर एकच शोककळा पसरली. अवघ्या सोळा वर्षांचे आयुष्य परंतु त्यावर पडलेल्या मृत्यूच्या घाल्याने परिसरातील सर्वजण दुःखी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी पाणबुड्यांच्या सहाय्याने आर्यनचा मृतदेह शोधून काढला व त्याच्या शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे.