कल्याणात १७० वर्ष जुना वटवृक्ष उन्मळून पडला

तीन इमारतींमधल्या अनेकांचे प्राण वाचले

कल्याण :  कल्याण पश्चिमेच्या दत्त आळी परिसरात असलेला सुमारे १७० वर्षे जुना वटवृक्ष रविवारी रात्री उन्मळून पडला आहे. याठिकाणी दत्ताचं मंदिर असून बाजूलाच हा भलामोठा वटवृक्ष होता. वृक्षाच्या दुसऱ्या बाजूला तीन रहिवासी इमारती आहेत. काल रात्रीच्या सुमारास अचानकपणे हा वटवृक्ष मुळासकट उन्मळून पडला. मात्र तो इमारतींवर न पडता दत्ताच्या मंदिरावर पडला. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. रहिवाशांचा जीव वाचवण्यासाठी अक्षरशः दत्तानेच हे संकट आपल्या अंगावर घेतल्याची भावना इथले रहिवासी व्यक्त करत असून आता याच वृक्षाचं पुन्हा एकदा रोपण करण्याचा सर्व रहिवाशी प्रयत्न करणार असल्याचे स्थानिक समीर लिमये यांनी सांगितले. त्यासाठी तज्ज्ञांनी मार्गदर्शन करण्याचं आवाहन रहिवाशांनी केलं आहे. वटपौर्णिमेला मोठ्या संख्येने याठिकाणी महिला वडाच्या पूजेसाठी येत होत्या.

हे झाड पडले तेव्हा या दत्त मंदिरात पुजारी होते. मात्र त्यांना देखील काही झाले नसून, मंदिरा शेजारी असलेले या पुजाऱ्यांच्या घरावर हे झाड पडल्याने घराचे नुकसान झाले आहे. तर या घटनेची माहिती मिळताच रात्री अग्निशमन दलाच्या जवानांनी याठिकाणी धाव घेतली होती. मात्र रात्र असल्याने आणि झाडामुळे येथील वीजपुरवठा करणाऱ्या वीजवाहिन्या देखील तुटल्याने वीज पुरवठा खंडीत झाल्याने सकाळी हे झाड बाजूला काढण्यास सुरवात केली. अग्निशमन दलाच्या २० जवानांनी कटर मशीन आणि इतर साहित्याच्या मदतीने हे झाड बाजूला केले असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी नामदेव चौधरी यांनी दिली.