डोंबिवलीत नामांकित गृहप्रकल्पाच्या कामगार वसाहतीला भीषण आग, एकाचा मृत्यू

रुणावल माय सिटी गृहप्रकल्पाच्या फेज २ मध्ये कामगारांसाठी उभारण्यात आलेल्या वसाहतीला आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. अल्पावधीतच या आगीने रौद्ररूप धारण केल्याने या वसाहतीत कामगारांसाठी उभारण्यात आलेल्या सर्वच्या सर्व म्हणजे १२० खोल्या भीषण आगीमुळे खाक झाल्या.

    डोंबिवली : पूर्वेकडील मानपाडा विभागातील कल्याण शीळ रोडवर उसरघर येथे असलेल्या रुणावल माय सिटी गृहप्रकल्पाच्या फेज २ मध्ये कामगारांसाठी उभारण्यात आलेल्या वसाहतीला आज सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली.
    अल्पावधीतच या आगीने रौद्ररूप धारण केल्याने या वसाहतीत कामगारांसाठी उभारण्यात आलेल्या सर्वच्या सर्व म्हणजे १२० खोल्या भीषण आगीमुळे खाक झाल्या.

    या रौद्ररूप धारण केलेल्या आगीमुळे कामगारांनी जीव वाचविण्यासाठी पळ काढला. मात्र तरीही या आगीत एका कामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर एक कामगार भाजल्याने गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव तपन महालदार असून सुरेश कुमार अस जखमी कामगाराचे नाव आहे.

    दरम्यान या आगीची माहिती मिळताच डोंबिवली मानपाडा अग्निशमन दलाच्या दोन गाड्यानी तातडीने धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले. प्राथमिक तपासणीत ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. तर गॅस सिलेंडर मुळेही आगीचा भडका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सदर आगीबाबाय पुढील तपास सुरु असल्याचे अग्निशमन अधिकाऱ्यांनी सांगितले. या आगीत कामगार वसाहतीतील सर्व सामानाची राखरांगोळी झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कामगारांनी नुकसान भरपाईची मागणी केली आहे.