पंतप्रधान आवास योजनेच्या सोडतीचा कार्यक्रम अचानक रद्द, आर्थिकदृष्या दुर्बल घटकातील नागरिकांची निराशा

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत च-होली, रावेत आणि बो-हाडेवाडी येथे आर्थिकदृष्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी बांधण्यात येणा-या सदनिकांच्या सोडतीचा कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोडत काढली जाणार होती. परंतु, अचानक सोडतीचा कार्यक्रम रद्द झाला आहे. दरम्यान, सोडतीचा कार्यक्रम नेमका कशावरून रद्द झाला, याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे.

पिंपरी (Pimpari).  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत च-होली, रावेत आणि बो-हाडेवाडी येथे आर्थिकदृष्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी बांधण्यात येणा-या सदनिकांच्या सोडतीचा कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोडत काढली जाणार होती. परंतु, अचानक सोडतीचा कार्यक्रम रद्द झाला आहे. दरम्यान, सोडतीचा कार्यक्रम नेमका कशावरून रद्द झाला, याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातून पंतप्रधान आवास योजनेतील घरांसाठी एकूण 47 हजार 878 इतके अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 47 हजार 801 अर्ज पात्र ठरले आहेत. त्यामुळे च-होली एक हजार 442, रावेत 934, बो-हाडेवाडी एक हजार 288 अशा एकूण 3 हजार 664 घरांसाठी सोडत काढण्यात येईल. या सोडतीनंतर सदनिकेची निवड यादी आणि प्रतिक्षा यादी तयार करण्यात येईल. या प्रकल्पात सदनिका धारकांना पहिल्यांदा 10 टक्के स्वः हिस्सा भरावा लागणार आहे. यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दिव्यांग व इतरांना आरक्षण ठेवले आहे.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आज (सोमवारी) दुपारी तीन वाजता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सोडत काढली जाणार होती. त्यासाठी दुपारपासून नागरिक जमा झाले होते. महापौर उषा ढोरे, भाजप शहराध्यक्ष, आमदार महेश लांडगे यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

पुण्याचे पालकमंत्री असताना चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी-चिंचवड शहरासाठी कोणतेही विकास काम केले नसल्याचा आरोप करत त्यांच्या हस्ते पंतप्रधान आवास योजनेच्या सोडतीला राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला. त्याविरोधात चिंचवड येथे निदर्शने केली. काळे झेंडे हातात घेऊन भाजपच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर साडेचारच्या सुमारास अचानक सोडतीचा कार्यक्रम रद्द झाल्याचे जाहीर करण्यात आले. त्यामुळे सोडतीसाठी आलेले नागरिक परत गेले. दरम्यान, सोडतीचा कार्यक्रम नेमका कशावरून रद्द झाला, याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे.