ठाणे जिल्ह्यात कोरोना लसीकरणाच्या तयारीला वेग, ८० हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ

कोरोनावर लस कधी येणार हे अद्याप निश्चित नसले तरी लस लवकर येण्याचे संकेत आरोग्य यंत्रणांनी दिले आहेत. तेव्हा,लस आल्यानंतर पहिला लाभ आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर ठाणे जिल्ह्यात सप्टेंबरपर्यंत बाधीत रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

ठाणे : जागतिक पातळीवर कोरोना प्रतिबंधक लस (corona vaccination) तयार करण्यात येत असुन काही महिन्यातच ही लस प्रत्यक्षात येईल. तेव्हा,याचा पहिला मान कोरोना लढ्यात आघाडीवर काम करणाऱ्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. या पाश्र्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील (Thane district) आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची (health workers) माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु (corona vaccination preparations) आहे. त्यानुसार,आत्तापर्यंत जिल्ह्यातील शासकीय आणि खाजगी क्षेत्रातील ५५ हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांची माहिती संकलित केली असुन आणखी २० ते ३० हजार जणांची नोदणी होईल. अशी माहिती सिव्हील रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.

कोरोनावर लस कधी येणार हे अद्याप निश्चित नसले तरी लस लवकर येण्याचे संकेत आरोग्य यंत्रणांनी दिले आहेत. तेव्हा,लस आल्यानंतर पहिला लाभ आरोग्य कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर ठाणे जिल्ह्यात सप्टेंबरपर्यंत बाधीत रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. मात्र,ऑक्टोबर महिन्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असुन कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस चढ-उतार होत असल्याने कोरोनाबाबत लोकांच्या मनातील भीतीदेखील काहीशी कमी झाली आहे.

ठाणे जिल्ह्याचा विचार करता, मागील आठ महिन्यात २ लाख ३१ हजार ७९० जणांना कोरोनाची लागण झाली असून त्यापैकी २ लाख १८ हजार ८३४ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. आतापर्यत कोरोनाने ५ हजार ७२६ जणांचा मृत्यू झाला आहे. आजघडीला ७ हजार २८९ रुग्ण जिल्ह्यातील विविध रुग्णालयात दाखल आहेत.

माहिती संकलन काम जोरात

कोरोनावर लस आल्यास आरोग्य विभागाच्या अधिकरी तसेच डॉक्टर यांना याचा प्रथम लाभ होणार आहे. जिल्यातून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नोंदणीला सुरुवात झाली असून मोठ्या प्रमाणावर माहिती नोंद होत आहे. जिल्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, नगरपालिका, जिल्हा परिषद मधील सर्व कर्मचाऱ्यांची नोंद करण्यात येत आहे. विविध रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, सेवाकर्मी यांना देखील यामध्ये समावेश करण्यात आले असून माहिती संकलन काम युद्धपातळीवर सुरू आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून कोरोना रूग्णांची अहोरात्र सेवा करीत आहेत.सरकारी तसेच,खाजगी क्षेत्रातील डॉक्टर,नर्स,वॉर्डबॉय, आया,सफाई कर्मचारी आदी समाजासाठी अहोरात्र झटणा-या वैद्यकिय कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने संरक्षण देणे अत्यंत गरजेचे आहे,याकरिता कोरोना प्रतिबंधक लस वितरणाचा प्राधान्यक्रम ठरवताना या कोरोना योद्धयांचा विचार करण्यात आला आहे.

- डॉ.कैलास पवार - जिल्हा शल्यचिकित्सक