pankaj ashiya

भिवंडी: भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात नागरिकांवर तसेच हॉटेल व्यावसायिकांवर कचरा फेकण्यासंदर्भात कोणतीही कारवाई होत नसल्याने इमारतींमधील रहिवासी व हॉटेल मालक आपल्या घरातील व हॉटेलमधील कचरा थेट रस्त्यावर फेकून देत आहेत . विशेष म्हणजे मनपा प्रशासनाच्या घंटा गाड्या अनेक ठिकाणी कचरा उचलण्यासाठी जात नसल्याची ओरड नागरिकांकडून वारंवार होत आहे. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याच्या अनेक तक्रारीदेखील मनपा प्रशासनाकडे येत आहेत .

विशेष म्हणजे या कचऱ्याच्या ढिगांमुळे शहरात अनेक ठिकाणी घाणीचे साम्राज्य देखील पसरले जात आहे . रोजच्या कचऱ्यावर तोडगा काढण्यासाठी मनपा आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी हॉटेल मालक व इमारतींच्या सोसायट्यांमधील रहिवासींनी आपल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी सोसायटी चेअरमन, सचिव व खजिनदार यांच्यासह हॉटेलच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी हॉटेल मालकावर सोपविली असून याठिकाणाहून निघणारा कचरा साठविण्यासाठी सोसायट्यांमध्ये व हॉटेल समोरच ओला कचरा व सुका कचरा साठविण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत.

यापुढे कचऱ्याची विल्हेवाट व्यवस्थित न लावल्यास अथवा कचरा रस्त्यावर फेकल्यास एक हजार रुपयांचे दंड आकारले असून दंडाची रक्कम तीन दिवसात न भरल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश मनपाच्या आरोग्य विभागाचे उपायुक्त यांनी दिले आहेत.