भिवंडीत आजपासून सात ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांच्या हाती! 

भिवंडी : तालुक्यातील ५० ग्रामपंचतींचा पाच वर्षांचा कालावधी डिसेंबर अखेर संपत असल्याने या ग्रामपंचतींच्या निवडणूकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून पाच महिन्यांपूर्वी घोषित करण्यात आला होता.मात्र या दरम्यान कोव्हीड-१९ विषाणूचा प्रादुर्भाव वाढून असंख्य नागरिकांचे मृत्यू तर अनेकांना त्याची बाधा निर्माण होऊन सर्वत्र हाहाकार माजला आहे.त्यामुळे देशभर राष्ट्रीय आपत्ती घोषित करावी लागली आहे.अशा या संकट काळात ग्रामपंचायत निवडणुका घेणे जनहिताच्या दृष्टीने हितावह ठरणार नसल्याचे समोर आल्याने अखेर राज्य सरकारने संपूर्ण राज्यातील ग्रामपंचायत निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलेल्या आहेत.मात्र या दरम्यान पक्षीय कार्यकर्त्यांची सोय व्हावी यासाठी राज्य शासनाने अध्यादेश जारी केले होते .मात्र या अध्यादेशाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आल्याने न्यायालयाने बिगर शासकीय व्यक्तीची नेमणूक करता येणार नाही त्यामुळे शासन स्तरावरील अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आली असून तालुक्यातील सात ग्रामपंचायतींचा कारभार सोमवारपासून प्रशासकांच्या हाती सोपवण्यात आला आहे.

यामध्ये तालुक्यातील चिंचवली (खांडपे ) ग्रामपंचायतीवर पंचायत समिती शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकारी वैशाली डोंगरे ,काल्हेर ग्रामपंचायत – आर.बी.भोसले ,खंबाळा – संजय थोरात ,नांदकर – सांगे — संजय आसवले ,सरवली – निता गवळी ,सुरई – सारंग — सुरेखा भोई ,तळवली – अर्जुनली — प्रिती संख्ये आदी विविध विभागाच्या विस्तार अधिकाऱ्यांची ठाणे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी ग्रामपंचायत प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे.या प्रशासकांना महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिनियम १९५९ अन्वये सरपंच व ग्रामपंचायतीस जे अधिकार प्राप्त आहेत ते सर्व अधिकार वापरण्याची मुभा आहे.मात्र अधिकारांचा वापर करताना काही त्रुटी निर्माण केल्यास अशा प्रशासकांचे अधिकार तात्काळ काढून घेण्याचा ईशारा मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांनी नियुक्ती पत्रात दिला आहे.तालुक्यातील लाखीवली ,झिडके व अस्नोली या तीन ग्रामपंचायतींवर जून महिन्यातच प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे तर उर्वरित ४० ग्रामपंचायतींवर १४ व १६ नोव्हेंबर रोजी प्रशासकांची नेमणूक केली जाणार असल्याचे पंचायत समिती सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.