bird flu

राज्यात कोरोनापाठोपाठ बर्ड फ्ल्यू(bird flue) संकट उभे राहिले आहे. हजारो कोंबड्या आणि वन्यप्राणी, पक्षी हे मृत्यूमुखी पडू लागले. बर्ड प्ल्यूचा फैलाव झाल्याने मृत्यूमुखी(death by bird flue) पडणाऱ्या पशूप्राण्यांच्या अंत्यविधीसाठी ठाणे जिल्ह्यात एकही स्मशान भूमी नाही.

सुरेश साळवे, ठाणे : राज्यात कोरोनापाठोपाठ बर्ड फ्ल्यू(bird flue) संकट उभे राहिले आहे. हजारो कोंबड्या आणि वन्यप्राणी, पक्षी हे मृत्यूमुखी पडू लागले. बर्ड प्ल्यूचा फैलाव झाल्याने मृत्यूमुखी(death by bird flue) पडणाऱ्या पशूप्राण्यांच्या अंत्यविधीसाठी ठाणे जिल्ह्यात एकही स्मशान भूमी नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला अधीन राहून ठाणे पालिका हद्दीत पशुप्राण्यांसाठी स्मशानभूमी व्हावी,अशी मागणी ठाणे पालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा यांच्याकडे ठाणे शहर अध्यक्ष जनहित व विधी विभाग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वप्नील महिंद्रकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

बर्ड फ्ल्यूचा संसर्ग वाढल्याने ठाण्यात तीन दिवसात १२१ पक्षांचा मृत्यू झाला. यात बगळे, पानबगळे, वानर, माकड, घुबड, पोपट, कावळे अशा वन्यप्राणी आणि पशूप्राण्यांचा समावेश आहे. या पशूप्राण्यांच्या निधनानंतर त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट ही एकतर कचऱ्याच्या डब्यात किंवा घनकचरा विभागाच्या माध्यमातून करण्यात येत असलायची माहिती समोर आलेली आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून सर्वत्रच कोरोनाचे सावट असतानाचा बर्ड फ्ल्यू या जीवघेण्या आजाराचा शिरकाव देशातील अनेक राज्यात झाला आहे. या आजाराचा माणसांनाही संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे ठाण्यातील अनेक नागरिक भीतीच्या वातावरणाखाली आहेत. मनुष्याच्या निधनानंतर त्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी जागोजागी स्मशानभूमी आणि शववाहिन्या अस्तित्वात असतात. मात्र भटक्या प्राण्यांची जिवंतपणाप्रमाणे त्यांच्या मरणानंतरही परवड सुरू आहे.

ठाणे शहरात सुमारे ४ हजार ३०० पाळीव तर दहा हजाराहून अधिक भटक कुत्रे आहेत. याशिवाय मांजर, पक्षी अशांची संख्या अधिक आहे. पण अशा पक्षी-प्राण्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार कुठे करायचे हा यक्षप्रश्न अनेक प्राणीप्रेमींना आहे. काहीजण मुंबईला नेऊन तेथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करतात तर काहीजण येथील पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या मार्फत त्याची विल्हेवाट लावतात. जिल्ह्यात प्राण्यांसाठी एक स्मशानभूमी अद्याप बांधली गेलेली नाही. तर ठाणे, पालघर आणि रायगड या तीनही जिल्ह्यांमध्ये खास प्राण्यांसाठी अशी कोणतीही स्मशानभूमी अस्तित्वात नसल्याचेही समोर आले आहे.

ठाणे जिल्ह्यात सध्या एकही पशुप्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी नाही, ती त्या-त्या महापालिकेच्या हद्दीतील प्रशासनाने उपाययोजना करावयाची असते. ठाणे पालिकेने मात्र अशा प्रकारची प्राणी-पक्षांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमी करायला हवी.

- लक्ष्मण पवार, पशुवैद्यकीय अधिकारी, जिल्हा परिषद

दिड वर्षांपूर्वी प्राण्यांसाठी स्मशानभूमी महासभेत प्रस्ताव

दिड वर्षांपूर्वी ठाण्यात मृत्यूमुखी पडलेल्या प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीच्या मागणीवरून महासभेत प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र त्या प्रस्तावाला मंजुरी न मिळाल्याने सध्या प्राण्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट ही घनकचरा विभागाच्या माध्यमातून लावण्यात येत असल्याची माहिती ठाणे महापालिका पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.

खाजगी डॉक्टर प्राण्यांच्या अंत्यसंस्कारासाठी करतात लूट

पाळीव प्राण्यांचा आणि पक्षाचा मृत्यू झाल्यानंतर ठाण्यात स्मशानभूमी नसल्याने काहीजण मुंबईच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जातात तर ठाण्यातील बहुतांश लोक हे पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या मार्फत त्याची विल्हेवाट लावतात. खासगी डॉक्टरांकडून यासाठी ३ हजारापासून १० हजारांपर्यंत शुल्क आकारले जात असल्याचे ठाणेकरांकडून सांगण्यात येत आहे.

ठाण्यात प्राण्यांच्या स्मशानभूमीसाठी भूखंड उपलब्ध करून देण्यास टाळाटाळ केली जात आहे. मुंबईप्रमाणेच ठाण्यात देखील प्राण्यांच्या स्मशानभूमीसाठी जागा देण्यात यावी व त्या जागेत स्मशान भूमी लवकरात लवकर विकसित करण्यात यावी. कारण आयुष्यभर भिरभिरणाऱ्या मुक्या प्राण्यांच्या आणि पक्षांच्या मृत्यूनंतर त्यांना अंत्यसंस्कारासाठी स्थायी जागा आवश्यक आहे.

- स्वप्नील महिंद्रकर, ठाणे शहर अध्यक्ष, जनहित व विधी विभाग महाराष्ट्र नवनिर्माण सेना