ganja seller kalyan

नशेबाजीचा व्यापार करतानाच नवऱ्याचे निधन झाल्याने बायकोने तस्करीचा वारसा(hemp smuggling business) पुढे नेत नशेबाजीचा व्यापार सुरु केला. मात्र पोलिसांना सुगावा लागल्याने तिच्यासह तस्कर दुकलीला महात्मा फुले चौक पोलिसांनी ताब्यात घेतले.

कल्याण : नशेबाजीचा व्यापार करतानाच नवऱ्याचे निधन झाल्याने बायकोने तस्करीचा वारसा(hemp smuggling business) पुढे नेत नशेबाजीचा व्यापार सुरु केला. मात्र पोलिसांना सुगावा लागल्याने तिच्यासह तस्कर दुकलीला महात्मा फुले चौक पोलिसांनी ताब्यात घेतले. उषाबाई पाटील असे गांजा तस्करी प्रकरणी अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. तर रोशन पाटील, अशोक कंजर असे तिच्यासह अटक केलेल्या दोन तस्करांची नावे आहे.

महात्मा फुले चौक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नारायण बानकर यांना एक तस्कर गांजा घेऊन कल्याणमध्ये येत असल्याची माहिती खबऱ्याने दिली होती. या माहितीच्या आधारावर कल्याणच्या शिवाजी चौक परिसरात पोलिसांनी सापळा लावला असता गांजा घेऊन आलेल्या तस्कर रोशन पाटील पोलिसांनी ताब्यात घेतले. तस्कर रोशन हा जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातून कल्याणला आला होता. त्याच्याकडून १.७५ किलो गांजा हस्तगत केला आहे. मात्र तस्कर रोशनने पोलिसांना धक्कादायक माहिती दिली.

हा गांजा जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे नशेबाजीचा व्यापार करणारी उषा पाटील आणि अशोक कंजर यांच्याकडून आणला होता. त्यांनतर सहायक पोलिस निरिक्षक दीपक सरोदे यांच्या नेतृत्वात पोलिसांचे एक पथक जळगावला तपासासाठी गेले. जळगावहून तस्कर अशोक कंजर आणि नशेबाजीचा व्यापार करणाऱ्या उषा पाटील दोघांना ताब्यात घेतले. तर तिच्या जोडीला अशोक कंजर हा मोठा गांजा तस्कर असल्याचे पोलीस तपासत समोर आले आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी काही दिवसापूर्वी ११६ किलो गांजा या दोघांकडे मिळून आला होता,अशी माहिती गुन्हे निरिक्षक संभाजी जाधव यांनी दिली आहे.

गांजा तस्कर मध्यप्रदेशातून कमी भावात गांजा घेऊन पंचवीस पट जास्त भावाने विकत असल्याची खळबळजनक माहिती कल्याणला अटक केलेल्या त्रिकूटकाकडून पोलिसांना मिळाली आहे. विशेष म्हणजे मध्यप्रदेशात हा गांजा ५०० ते ६०० रुपये किलो दराने विकत घेतला जातो. जळगावमध्ये हा गांजा ३ हजार रुपयांमध्ये विकला जातो. कल्याणात येईपर्यंत ही किंमत १३ हजार रुपये किलो होते. गांजाच्या व्यापारात बक्कळ फायदा असल्याने नवऱ्याच्या निधनानंतर बायकोने हा नशेबाजीचा गोरखधंदा सुरु केला होता.