पावसाचा जोर कायम राहिल्यास २६ जुलै २००५ सारखी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता?

भारतीय हवामान विभागानं जारी केलेल्या माहितीनुसार, मागील चोवीस तासांत ठाणे जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. एकट्या उल्हासनगर परिसरात तब्बल 400 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर त्यापाठोपाठ शहापूर 200 मिमी, कल्याण-180 मिमी, भिवंडी- 155 मिमी आणि मुरबाड याठिकाणी 56 मिमी पाऊस कोसळला आहे.

    मागील तीन दिवसांपासून ठाण्यात पावसानं कहर केला आहे. ठाणे शहरासह जिल्ह्याला पावसानं चांगलचं झोडपून काढलं आहे. यामुळे ठाण्यातील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. तर ठाण्यानजीक असणारा मासूंदा तलाव देखील ओसंडून वाहू लागला आहे. त्यामुळे शहराला नदीचं स्वरुप आलं आहे.

    याशिवाय हाजूरी, राम मारुती रोड, कासारवडवली, वागळे इस्टेट, नौपाडा, जांभळी नाका, पिसे, मानपाडातील काही भाग आणि ठाणे पश्चिम बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे. तर, ठाणे शहराला लागून असलेला शिळ डायघर महामार्ग आजही पाण्याखाली आहे.

    सलग ३ दिवस शिळ महामार्ग पाण्याखाली असल्याने सध्या इथं गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. याशिवाय दिवा शिळ चौकातील मुंब्रा खान कम्पाउंड महामार्ग पुर्ण पाण्याखाली आहे. मुंब्रा शहरात रहिवाशी भागात पाणी साचण्याचे प्रमाण वाढू लागले आहे.

    भारतीय हवामान विभागानं जारी केलेल्या माहितीनुसार, मागील चोवीस तासांत ठाणे जिल्ह्यात विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. एकट्या उल्हासनगर परिसरात तब्बल 400 मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर त्यापाठोपाठ शहापूर 200 मिमी, कल्याण-180 मिमी, भिवंडी- 155 मिमी आणि मुरबाड याठिकाणी 56 मिमी पाऊस कोसळला आहे.

    दरम्यान, पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास २६ जुलै २००५ सारखी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यताही वाढत आहे.