कोपर उड्डाणपुलाच्या सर्व गर्डरचे काम पूर्ण; पावसाळ्यापूर्वीच वाहतुकीसाठी होणार खुला

कोपर उड्डाण पूल धोकादायक झाल्यामुळे १५ सप्टेंबर २०१९ पासून वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. हा पूल बंद असल्याने नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी कोविड-१९ च्या संचार बंदीच्या काळात रेल्वे सेवा बंद असताना उड्डाण पूल पुर्नबांधणीचे काम महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशाने तातडीने हाती घेण्यात आले.

    कल्याण : डोंबिवली पूर्व पश्चिमला जोडणाऱ्या कोपर उड्डाणपुलाचे सर्व गर्डर बसविण्याचे काम पूर्ण झाले असून पावसाळ्यापूर्वी हा ब्रीज नागरिकांना वाहतुकीसाठी खुला होणार आहे.

    कोपर उड्डाण पूल धोकादायक झाल्यामुळे १५ सप्टेंबर २०१९ पासून वाहतूकीसाठी बंद करण्यात आला होता. हा पूल बंद असल्याने नागरिकांना होणारा त्रास दूर करण्यासाठी कोविड-१९ च्या संचार बंदीच्या काळात रेल्वे सेवा बंद असताना उड्डाण पूल पुर्नबांधणीचे काम महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या निर्देशाने तातडीने हाती घेण्यात आले. १७ एप्रिल रोजी रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने प्रत्यक्ष कामास सुरुवात करण्यात आली.

    २२ मार्च २०२१ रोजी १५ मिटरचे ७ गर्डर बसविण्यात आले आणि २ एप्रिल रोजी १२ मिटरचे आणखीन ७ गर्डर बसविण्यात आले. आज ३ मे रोजी तिसऱ्या व शेवटच्या स्‍पॅनचे १८ मिटरचे ७ गर्डर चढविण्याचे काम पूर्ण करण्यात आले. राजाजी पथवरील स्पॅनचे कामाकरीता ७ मे पर्यंत वाहतूक बंद करण्यात आलेली आहे. हे गर्डर्स चढवून झाल्यानंतर क्रॉस गर्डर्स जोडण्यासाठी व स्लॅबचे सेंटरींग लावताना पादचाऱ्यांच्या व वाहनांच्या सुरक्षिततेसाठी रस्त्‍यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आलेली आहे.

    पोहोच रस्त्याचे उर्वरित काम व गर्डरवरील स्लॅबचे काम पूर्ण करुन येत्या पावसाळयापूर्वी कोपर ब्रीज वाहतुकीला खुला करणेबाबत नियोजन करण्यात आले असल्याचे महापालिकेच्या वतीने कळविण्यात आले आहे.