कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती सज्ज, लसीकरणासंदर्भात नवी मुंबई पालिका आयुक्तांना केली विनंती

कृषी उत्पन्न बाजार समितीतील(market committee) बाजार घटकांचे देखील लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासंदर्भात आयुक्त अभिजित बांगर यांना विनंती करण्यात आली आहे. आयुक्तांनी देखील सकारात्मकता दर्शवल्याचे बाजार समिती सभापती अशोक डक यांनी सांगितले आहे.

  नवी मुंबई : नवी मुंबईत कोरोना वाढत असताना आशियातील सर्वात मोठी बाजार समिती असलेली मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीदेखील(APMC) सतर्क झाली आहे. बाजार समितीतील(market committee) बाजार घटकांचे देखील लसीकरण करण्यात येणार असून त्यासंदर्भात आयुक्त अभिजित बांगर यांना विनंती करण्यात आली आहे. आयुक्तांनी देखील सकारात्मकता दर्शवल्याचे बाजार समिती सभापती अशोक डक यांनी सांगितले.

  कोरोना विषाणूचा वाढता प्रसार व संसर्ग लक्षात घेत बाजार समितीच्या विविध बाजार आवारात बाजार समितीच्या समिती सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी सभापती अशोक डक, कामगार नेते व आमदार शशिकांत शिंदे, बाजार समितीचे उपसभापती धनंजय वाडकर, अशोक वाळूज, शंकर पिंगळे, संजय पानसरे, निलेश वीरा, विजय भुता हे संचालक उपस्थित होते.

  कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून शासनाने तसेच नवी मुंबई महानगरपालिकेने वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन बाजार आवारात कार्यरत सर्व घटकांनी करावे. लसीकरणाबाबत आयुक्तांशी बोलणे झाले असून; त्यांनी याबाबतीत सकारात्मकता दर्शवली आहे. एपीएमसी हे पुन्हा कोरोनाचे केंद्रबिंदू ठरू नये यासाठी सुरक्षेच्या नियमांची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे अन्यथा दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.

  - अशोक डक, सभापती, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती

  बाजार आवारात कार्यरत व्यापारी, अडत्ये, माथाडी, मापाडी, मदतनीस, बाजार समितीचे अधिकारी/कर्मचारी इत्यादी
  बाजार घटकांचे लसीकरण करण्याबाबत निर्णय बैठकीत घेण्यात आला. बाजार आवारात कार्यरत असलेल्या कामगारांची रॅपीड ॲन्टीजन टेस्टची संख्या वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच जे व्यापारी, अडत्ये, कामगार, माथाडी, मापाडी कामगार विना मास्क बाजार आवारात वावरताना दिसतील, सोशल डिस्टन्सिंग पाळणार नाहीत किंवा कोविड सुरक्षिततेचे इतर नियम पायदळी तुडवताना दिसतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याच्या सुचना या बैठकीत सुरक्षा विभागास देण्यात आल्या. तसेच बाजार समितीची फळे, भाजीपाला, कांदा बटाटा, विकास टप्पा-२, मार्केट-१ (मसाला मार्केट) विकास टप्पा-२, मार्केट-२ (धान्य बाजार) या बाजार आवारांचे आठवडयातून एकदा निर्जंतुकीकरण करण्याच्या देखील सुचना यावेळी सभापती डक यांनी दिल्या.

  आंब्या व्यतिरिक्त इतर फळांचा व्यापार स्थलांतरित

  बाजार समितीच्या फळ बाजार आवारात आंबा हंगाम सुरु होत असल्याने बाजार आवारात कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून कलिंगड, खरबुज इ. फळांचा व्यापार १ एप्रिल ते ३१ मे २०२१ या कालावधीत तात्पुरत्या स्वरुपात एस. टी. महामंडळाच्या जागेवर स्थलांतरीत करण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.