anand paranjape and naresh mhaske

ठाणे महापालिकेच्या(Thane Corporation) सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आंदोलन केले होते. त्यावर महापौर नरेश म्हस्के(Mayor Naresh Mhanske) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर (Rashtrawadi Congress) टीका करत आम्हाला तुमची गरज नाही असे सांगितले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष यांनी उडी मारली असून राष्ट्रवादीमुळेच म्हस्के बिनविरोध महापौर झाले असल्याची आठवण करून दिली.

    ठाणे : राज्याच्या राजकारणात एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलेले शिवसेना(Shivsena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस(Rashtrawadi Congress) सत्ता गाजवत असताना ठाण्यात मात्र या दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये वादावादी सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मंगळवारी ठाणे महापालिकेच्या(Thane Corporation) सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी आंदोलन केले होते. त्यावर महापौर नरेश म्हस्के(Mayor Naresh Mhanske) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर (Rashtrawadi Congress) टीका करत आम्हाला तुमची गरज नाही असे सांगितले असताना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष यांनी उडी मारली असून राष्ट्रवादीमुळेच म्हस्के बिनविरोध महापौर झाले असल्याची आठवण करून दिली. त्यामुळे एकीकडे राज्यात सेना आणि राष्ट्रवादी गुण्यागोविंदाने नांदत असले तरी ठाण्यात मात्र वेगळे चित्र दिसत आहे.

    ठाणे महापलिकेची मंगळवारी महासभा सुरु असताना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी आंदोलन केले होते. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना महापौर नरेश म्हस्के यांनी आपणाला राष्ट्रवादीची गरज नाही, असे विधान केले होते. त्यांच्या या विधानाचा आनंद परांजपे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. विस्मृती ही देवाने मानवाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के! ज्यावेळी महापौरपदाची निवडणूक झाली. त्यावेळी शिवसेनेचे नेते, पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीचे नेते ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांना फोन करुन शिवसेनेचा महापौर बिनविरोध व्हावा, अशी विनंती केली होती. त्यानंतर १७ नोव्हेंबर २०१९ रोजी एकनाथ शिंदे आणि उमेदवार म्हणून नरेेश म्हस्के हे तत्कालीन विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांच्या दालनात आले. त्यावेळी आपणांसह गटनेते नजीब मुल्ला आणि राष्ट्रवादीचे नगरसेवकदेखील उपस्थित होते. त्यावेळी शिंदे आणि म्हस्के यांनी, “राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत आहे; त्यामुळे ठाण्यातही महापौरपदाची निवडणूक बिनविरोध करावी”, अशी विनंती केली.

    त्यावेळी राष्ट्रवादीने मोठ्या दिलाने निवडणुकीतून माघार घेत शिवसेनेला महापौरपद बिनविरोध पद्धतीने दिले. त्यानंतर २१ नोव्हेंबर २०१९ रोजी नरेश म्हस्के हे महापौर झाले. म्हणूनच आपण, विस्मृती ही देवाने मानवाला दिलेली सर्वात मोठी देणगी आहे, असे म्हणत असून नरेश म्हस्के हे १७ नोव्हेंबर २०१९ ची घटना विसरले असतील. म्हणून मी त्यानिमित्ताने पुन्हा एकदा ही आठवण करुन देतो असे आनंद परांजपे यांनी यावेळी सांगितले.

    शिवसेनेचा अनागोंदी कारभार ठाणेकरांसमोर आणणारच – परांजपे

    राज्यात महाविकास आघाडी म्हणून एकत्र काम करीत असतानाही राष्ट्रवादीने ठाण्यात सत्ताधार्‍यांच्या विरोधात आंदोलन केले आहे. त्याबद्दल आनंद परांजपे यांनी म्हटले की, ठामपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करतोय. शिवसेनेच्या राजवटीत जी काही अनागोंदी चालली आहे. त्याची पोलखोल महासभा आणि ठाणेकरांसमोर करावी लागणारच आहे. अन् ती आम्ही करीत आहोत. कोविडच्या काळात ठामपा प्रशासनाकडून अनागोंदी कारभार करण्यात आला आहे आणि शासन म्हणून शिवसेनेचा त्यांच्यावर वचक नव्हता. सत्ताधारी शिवसेना दुटप्पी भावनेने वागत आहे; लसीकरण, विकासनिधीमध्ये सेनेकडून राजकारण केले जात आहे. याचा आक्रोश कधी ना कधी होणारच होता.

    ते पुढे म्हणाले की, कालच्या महासभेत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे बोलणे सुरु असताना सचिवांकडून महापौरांच्या इशार्‍यावरुन आवाज म्यूट केले गेले. म्हणून त्यांचा आवाज महासभेपर्यंत पोहचावा, यासाठी नरेंद्र सभागृहामध्ये राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक घुसले होते. महापौरांनी विकासनिधी रोखला होता, यासाठीही हे आंदोलन होते. शिवसेनेच्या शाखा-शाखांमधून लसीकरण होत असताना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी लसीसाठी मागणी केली की ती नाकारली जाते. लसीकरणाच्या ज्या चार बसेस आहेत. त्यापैकी दोन प्रशासनाने ठेवल्या आहेत. तर, दोन बसेस महापौरांनी स्वत:च्या अधिकारात ठेवल्या आहेत. त्या बसेसदेखील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना देण्यात आल्या नाहीत, म्हणूनच काल हा आक्रोश झाला. काल सभागृह नेते अशोक वैती यांनीदेखील कोविडच्या कार्यकाळात मोठमोठ्या ठेकेदारांची बिले अदा करण्यात आली आहेत, असा आरोप केला आहे. परिवहनची आर्थिक परिस्थिती कमकुवत असताना परिवहनची पाच कोटींची एफडी तोडून ठेकेदाराला बिले देण्यात आली, असा अनागोंदी कारभार आयुक्त डॉ. विपीन शर्मा करीत आहेत. आणि सत्ताधारी शिवसेनेचा त्यांच्यावर वचक नाही. त्यामुळेच सक्षम विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी महासभेत आणि ठाणेकरांसमोर चुकीच्या निर्णयाचा विरोध करेल, असा इशाराही दिला.