अंघोळीची गोळी संस्थेचा कल्याण शहरामध्ये खिळेमुक्त झाडांचा उपक्रम

कल्याण : अंघोळीची गोळी संस्थेच्या माध्यमातून पाणी बचतीचा आणि वृक्ष संवर्धननाचा संदेश देणारी मुंबईतील तरुण मंडळी पाणी वाचवण्याचे आवाहन नागरिकांना नेहमी करत असते. प्रेम, त्याग, बंधुभाव, बचत या चार

कल्याण : अंघोळीची गोळी संस्थेच्या माध्यमातून पाणी बचतीचा आणि वृक्ष संवर्धननाचा संदेश देणारी मुंबईतील तरुण मंडळी पाणी वाचवण्याचे आवाहन नागरिकांना नेहमी करत असते. प्रेम, त्याग, बंधुभाव, बचत या चार तत्वांवर अंघोळीची गोळी संस्था उभारलेली आहे. पाणी बचतीचे आणि संवर्धनाचे ध्येय उराशी बाळगुन अंघोळीची गोळी संस्थेच्या टीम मुंबईतील ही तरुण मंडळी शाळा, महाविद्यालय येथे जाऊन पाण्याचे महत्वदेखील पटवून देत असते. याच अंघोळीच्या गोळीच्या टीमने नुकतेच कल्याण शहरांमधील झाडांवरील बॅनर, पोस्टर काढण्याचा उपक्रम पार पाडला.

खिळेमुक्त झाड संकल्पनेचा उदय पुण्यात सर्वात प्रथम झाला आणि त्यातून प्रेरित होऊन मुंबई टीमने हा उपक्रम राबवला. गेल्या दोन वर्षांपासुन हा उपक्रम मुंबईतील विविध भागात राबविला जात आहे. वृक्ष संवर्धन हेच ग्लोबल वॉर्मिंगला उत्तर आहे त्यामुळे खिळेमुक्त झाड हा उपक्रम सर्वांनी आपल्या शहरांत राबवावा असे आवाहन अंघोळीची गोळी संस्थेचे कार्यकर्ते स्वप्नील शिरसाठ यांनी यावेळीं केले. पुण्याच्या माधव पाटील या तरूणाने सुरु केलेली खिळेमुक्त झाडं मोहीम ठाणे आणि मुंबई परिसरात विस्तारण्यासाठी अंघोळीची गोळी टीम मुंबई प्रयत्न करत आहे आणि पर्यावरण संवर्धनाच्या या चळवळीत अनेक सामाजिक संस्थांची मदत या युवकांना मिळत आहे. या मोहिमेत युवकांनी प्रामुख्याने झाडांना पोस्टरमुक्त, बॅनरमुक्त करण्याचा प्रयत्न केला. कल्याण शहरांत राबवण्यात आलेल्या मोहिमेत भुषण राजेशिर्के, शुभम आलसी, चंद्रमनी घोडके, रोहीत गोडसे या युवकांनी सहभाग घेतला.

वृक्ष संवर्धनासाठी अनेक महानगरपालिकांसोबत आमचा पत्रव्यवहार चालु आहे, अशी माहीती यावेळी अविनाश पाटील यांनी दिली. झाडांचे संरक्षण म्हणजेच वसुंधरा संरक्षणासाठी उचललेले एक छोटे पाऊल आहे असेही ते यावेळी म्हणाले. मोहिमेत ६५ झाडांवरील बॅनर, पोस्टर आणि २० पेक्षा अधिक वडाच्या झाडांना गुंडाळण्यात आलेले धागेदोरे काढण्यात आले. वडाच्या झाडांना कचरा टाकण्याचे ठिकाण बनवण्यात येवु नये यासाठी सर्वांनी मिळुन काम करण्याची गरज आहे, असेही या युवकांनी यावेळीं सांगितले.