डोंबिवलीत ओल्या कचऱ्यावर मोकाट जनावरे पडली तुटून

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेने शहर स्वच्छतेसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. २५ मे पासून पालिकेने ओला व सुका कचरा वेगळा करून देण्याचे निवासी संकुलांना आवाहन केले. या उपक्रमाला जरी

 डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेने शहर स्वच्छतेसाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. २५ मे पासून पालिकेने ओला व सुका कचरा वेगळा करून देण्याचे निवासी संकुलांना आवाहन केले. या उपक्रमाला जरी चांगला प्रतिसाद मिळत असला तरी निवासी संकुलातील कचरा गोळा करणारे ओला कचरा गोग्रासवाडी येथील रस्त्यावर टाकत असल्याने मोकाट जनावरे सकाळी सकाळी त्या कचऱ्यावर तुटून पडत असल्याचे दिसत आहे.

कोरोनाच्या काळात साथ रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पण प्रशासनाने स्वच्छतेला प्राधान्य दिले असून पालिका क्षेत्रातील निवासी संकुलांना ओला व सुका कचरा स्वतंत्र करून देण्याचे बंधन घालण्यात आले आहे. त्याप्रमाणे सफाई कर्मचारी रोज ओला कचरा गोळा करत असून तो कचरा घंटा गाडीत टाकण्यात येणं आवश्यक असताना गाडी वेळेवर येत नसल्याने ओला कचरा रस्त्यावर टाकला जातो. गोग्रासवाडी गेटजवळ ओला कचरा रोज रस्त्यावर टाकून दिला जातो त्या ठिकाणी मोकाट जनावरे तुटून पडत असल्याचे रोजचे चित्र आहे या ओल्या कचऱ्यायामुळे दुर्गंधी निर्माण होऊन रोगराई पसरण्याची भीती आहे. सर्वसाधारण डोंबिवली विभागात अशीच परिस्थिती असल्याची ओरड आहे.२५ मे पासून ऐन पावसाच्या तोंडावर पूर्वकल्पना न देता, जनजागृती न करता ही मोहीम राबवण्यात येत आहे. वास्तविक योग्य जनजागृती करून पाऊस संपल्यावर ही योजना अंमलात आणणे आवश्यक होते पण घाईत ही योजना अंमलात आल्याने यात गोंधळ दिसत आहे.
 
ओला कचऱ्यातून बायोगेस तयार करण्याची योजना असून पालिकेने प्रकल्प तयार केला. पण गेली दीड दोन वर्षे तो प्रकल्प तसाच पडून असल्याने घाई घाईत सुरवात करण्यात आल्याचे कर्मचारी सांगतात. निवासी संकुलातील सफाई कर्मचारी ओला कचरा गोळा करतात पण घंटा गाडीचे वेळापत्रक पाळले जात नाही म्हणून रस्त्यावर कचरा टाकला जातो असे समर्थन केले जाते आठवड्यातून बुधवार व रविवार केवळ सुका कचरा व रोज ओला कचरा असे ठरले असताना सुका कचरा नेतात त्या दिवशी ओला कचरा उचलला जात नसल्याची महिलांची तक्रार आहे. पालिकेची योजना चांगली असली तरी सध्या बहुसंख्य कर्मचारी कोरोना मध्ये गुंतलेले आहेत यामुळे प्रशासनाने ही योजना स्थगित ठेवून गणेशोत्सवातर योग्य प्रसार व जागृती करावी नाहीतर मोकाट जनावरे या कचऱ्यावर तुटून पडतील व पावसात कचरा कुजून रोगराई पसरण्याची भीती आहे.