अंजूरफाटा – चिंचोटी महामार्ग दुरुस्तीच्या कामास सुरुवात

भिवंडी : राज्य शासनाने भिवंडीतील माणकोली – अंजूरफाटा – चिंचोटी या २६ किमी.लांबीच्या रस्त्याच्या देखभाल दुरुस्ती व टोल वसूूलीचे काम मे.सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला दिले आहे.मात्र या रोडवरील अंजूरफाटा ते मालोडी पर्यंतचा सुमारे ५ किमी.लांंबीच्या रस्त्यावर बेसुमार खड्डे पडून रस्ता नादुरुस्त झाला आहे.त्यातच गणेशोत्सव सण अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपला आहे.सणासुदीचा काळ सुरू झाल्याने या रस्त्यावरून ट्रान्सपोर्टची मालवाहू वाहने व सामान खरेदीसाठी नागरी वाहनांची वर्दळ वाढली असून खड्डेमय रस्त्याचा सामना वाहन चालकांसह प्रवाश्यांना करावा लागत आहे.त्यामुळे या विरोधात स्थानिक ग्रामविकास संघर्ष समिती व मनसेने ओरड सुरू करून रस्ता लवकर दुरुस्त करावा अशी मागणी केली आहे.त्याची दखल सार्वजनिक बांधकाम उपविभाग भिवंडी व सुप्रिम इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने घेऊन काही ठिकाणी रस्ता सिमेंट काँक्रीटचा तयार करण्यासाठी तर ठिकठिकाणी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले आहे.मात्र गेल्या दहा दिवसांपासून परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे रस्ता दुरुस्तीमध्ये अडथळे निर्माण होत असल्याचे सार्वजनिक बांधकाम उपविभागाकडून सांगण्यात येत आहे.असे असताना पाऊस कितीही पडत असला तरी गणेशोत्सवापूर्वी रस्ता दुरुस्त करण्याचे काम पूर्ण केले जाईल असा विश्वास सुप्रीम कंपनीचे जनरल मॅनेजर जमीर शेख यांनी व्यक्त केला आहे.या रस्त्याबाबत त्यांनी अधिक माहिती देताना सांगितले की सदरचा माणकोली अंजूरफाटा चिंचोटी रस्ता हा संपूर्ण दलदलीच्या भागातून गेलेला आहे.तसेच बहुतांश भाग खाडी किनाऱ्यालगत असल्याने रस्त्याच्या पृष्ठभागावर वारंवार खड्डे पडून रस्ता नादुरुस्त होत आहे.त्यामुळे भविष्यात नागरिकांच्या सुखकर प्रवासासाठी शासन निर्देशानुसार सिमेंट काँक्रीटने रस्ता तयार करावा लागणार आहे.सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे तसेच दलदलीमुळे रस्त्याची झालेली वाताहत पाहता काँग्रेसच्या शिष्टमंडळाच्या प्रयत्नाने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी विशेष बाब म्हणून ७ कोटी रुपये या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मंजूर केले आहेत.मात्र पावसाळा संपताच सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या रस्त्याच्या नूतनिकरणाचे काम हाती घेतले जाणार आहे.त्यानंतरच वाहन चालकांसह प्रवाश्यांना रस्त्यावरून प्रवास करणे अधिक सुलभ होणार आहे अशी माहिती सुप्रीम कंपनीचे जनरल मॅनेजर जमीर शेख यांनी दिली आहे.