ठाण्यातील हॉटस्पॉट विभागात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊनची घोषणा

  • ठाण्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता ठाणे महापालिकेचे आयुक्त विपीन शर्मा यांनी कोरोनावर आळा घालण्यासाठी ठाण्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्याची महत्त्वाची घोषणा केली आहे.

ठाणे : ठाण्यात कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. तसेच मागील दोन दिवसांमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. आज दिवसभरात १ हजार ८२२ नव्या रूग्णांची नोंद झाल्याची माहिती समोर आली आहे. तर ४३ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ठाण्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता ठाणे महापालिकेचे आयुक्त विपीन शर्मा यांनी कोरोनावर आळा घालण्यासाठी ठाण्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन करण्याची महत्त्वाची घोषणा केली आहे.

ठाण्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे ठाण्यातील हॉटस्पॉट ठरलेल्या विभागात पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचे आदेश ठाणे महापालिकेचे आयुक्त विपीन शर्मा यांनी दिले आहेत. तसेच कंटेन्मेंट झोन वगळता इतर विभाग खुले राहणार आहेत. 

दरम्यान, कोरोनाच्या संसर्गामुळे २ जुलै ते १२ जुलैपर्यंत ठाण्यात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. परंतु कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे, हा लॉकडाऊन १९ जुलैपर्यंत वाढवण्यात आला. तसेच ठाणे जिल्ह्यात कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि मीरा-भाईंदरमध्ये कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.