कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात रांगे व्यतिरिक्त प्रवासी भरणाऱ्या रिक्षाचालकांवर होणार कारवाई

न्यायालयाने मीटर नुसार रिक्षा चालविण्याचे आदेश दिल्यानंतरही कल्याण शहरात मात्र रिक्षा चालकांकडून मीटरप्रमाणे सेवा देण्यास नकार दिला जातो. अनेकदा प्रवाशांसोबत हुज्जत घालणे, प्रवाशांना दमदाटी करणे आणि मारहाण करणे असे प्रकार घडतात. यांच्यावर राजकीय वरदहस्त असल्यामुळे या रिक्षा चालकांची मनमानी वाढत आहे.

    कल्याण रेल्वे स्थानकात दिवसभरात लाखो रिक्षांची वरदळ असते. त्यामुळे या रिक्षांच्या विळख्यातून रस्ता काढताना प्रवासी, बसेस आणि रुग्णवाहिका देखील मेटाकुटीला येतात. या रिक्षा चालकाना शिस्त लागावी म्हणून आता वाहतूक विभागाने बडगा उगारला आहे. त्यामुळे आता रिक्षा चालकांना प्रवाशांच्या मागणीनुसार रिक्षा सेवा द्यावी लागणार आहे. तसेच रांगे व्यतिरिक्त प्रवासी भरणाऱ्या रिक्षाचालकावर कायदेशीर कारवाई देखील केली जाणार आहे.

    न्यायालयाने मीटर नुसार रिक्षा चालविण्याचे आदेश दिल्यानंतरही कल्याण शहरात मात्र रिक्षा चालकांकडून मीटरप्रमाणे सेवा देण्यास नकार दिला जातो. अनेकदा प्रवाशांसोबत हुज्जत घालणे, प्रवाशांना दमदाटी करणे आणि मारहाण करणे असे प्रकार घडतात. यांच्यावर राजकीय वरदहस्त असल्यामुळे या रिक्षा चालकांची मनमानी वाढत आहे.

    कल्याण रेल्वे स्टेशन परिसरासह रस्त्यावर कशाही रिक्षा उभ्या करून वाहतूक कोंडी करणाऱ्या रिक्षा चालकांना आजवर अनेकदा शिस्त लावण्याचे प्रयत्न झाले. पण रिक्षाचालकांची मुजोरी कायम आहे. आता पुन्हा एकदा वाहतूक पोलीस निरीक्षक सुखदेव पाटील यांनी यासाठी कंबर कसली असून कल्याण डोंबिवलीत रिक्षा चालकांनी ठराविक ठिकाणी जाणाऱ्या रिक्षाच्या स्वतंत्र मार्गिका तयार केली होती.

    आता कल्याण स्टेशन परिसरात महापालिकेच्या स्मार्ट सिटी योजनेतून काम सुरु असून, या ठेकेदाराकडून वाहतूक पोलिसांनी लोखंडी बॅरीकेट बसवून स्टेशन परिसरात रिक्षा स्टॅंडसाठी जागा निश्चित केली आहे. १ सप्टेबर पासून कल्याण स्थानकात ठाणे स्थानकाप्रमाणे एका रांगेत रिक्षा चालकांना प्रवाशांना सेवा द्यावी लागणार आहे. स्टेशन परिसरात रांगेत उभे असणाऱ्या प्रवाशांना ज्या ठिकाणी जायचे आहे त्या ठिकाणी रांगेतील रिक्षाचालकाने प्रवाशांना सेवा देणे बंधनकारक असणार आहे. रांगेशिवाय रिक्षा चालकांना प्रवासी भाडे घेता येणार नाही.

    स्थानकात आरटीओकडून ठरवून दिलेल्या भाडेदराचे पत्रक प्रसिद्ध केले जाणार असून या दराप्रमाणे भाडे आकारून प्रवाशांना सेवा द्यावी लागणार आहे. भाडे नाकारणाऱ्या तसेच रांगेबाहेर भाडे स्वीकारणाऱ्या रिक्षा चालकावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. १ सप्टेबर २०२१ पासून या नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे.