गाळ्यात फुलविक्री ऐवजी भाजीपाला विक्रीला परवाना मिळावा म्हणून व्यापाऱ्याने केला अर्ज, एपीएमसीच्या निरीक्षकाने मागितली लाच अन् सापडला रंगेहाथ

व्यापाऱ्याकडून १६ हजारांची लाच घेताना कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे (APMC)निरीक्षक जयवंत अधिकारी याला ठाणे(Thane) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक(ACB Arrested APMC Officer) केली.

    कल्याण : फुलांऐवजी भाजीपाल्याचा परवाना देण्यासाठी व्यापाऱ्याकडून १६ हजारांची लाच घेताना कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे (APMC)निरीक्षक जयवंत अधिकारी याला ठाणे(Thane) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक(ACB Arrested APMC Officer) केली. ही कारवाई बुधवारी संध्याकाळच्या सुमारास करण्यात आली.

    यातील तक्रारदार व्यापाऱ्याचा कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फुल विक्रीचा परवाना असलेला गाळा आहे. या गाळ्यात फुलविक्री ऐवजी भाजीपाला विक्री परवाना हस्तांतरण करण्यासाठी अर्ज केला होता. हा भाजीपाला विक्रीचा परवाना करून देण्यासाठी कल्याण एपीएमसीचे निरीक्षक जयवंत अधिकारी याने या व्यापाऱ्याकडे १६ हजार रुपयांची लाच मागितली होती. निरीक्षक अधिकारी याने केलेल्या पैशांच्या मागणीबद्दल व्यापाऱ्याने ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

    दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार बुधवारी सायंकाळी एसीबीचे पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण घाडीगांवकर आणि त्यांच्या पथकाने सापळा रचला आणि लाच स्वीकारताना एपीएमसीचे निरीक्षक जयवंत अधिकारी याला ताब्यात घेतले.

    या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालयातील निरिक्षकाला लाच घेताना पकडल्याने कार्यालयातील आणखी किती मोहरे पोलिसांच्या गळाला लागणार अशा चर्चा यानिमित्ताने रंगल्या आहेत.