प्लाझमा दानविषयी जनजागृती व सनियंत्रणाकडे विशेष लक्ष देत नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती

रक्तातील तांबड्या पेशी वगळून उर्वरित रक्तद्रव्य म्हणजे प्लाझमा. कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तीच्या रक्तातील प्लाझमा २८ दिवसांनंतर रोगप्रतिकार क्षमता कमी असेल अशा व्यक्तीच्या शरीरात दिल्यास प्लाझमामुळे त्यांच्या अँटिबॉडीज वाढतात व रोगप्रतिकार क्षमता वाढून विषाणूची तीव्रता कमी होण्यास मदत होते.

  नवी मुंबई : कोरोनावरील उपचारांमध्ये प्लाझ्मा थेरपी ही अत्यंत लाभदायक ठरत असल्याचे अनेक उदाहरणांवरून दिसून येत असून रक्तदानाप्रमाणेच प्लाझमा दानासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करणे आणि प्लाझमा संकलन व वितरण याचे सनियंत्रण करणे याकडे विशेष लक्ष देत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी याकामी नोडल अधिकारी म्हणून रक्त संक्रमण अधिकारी डॉ. प्रिती संगानी यांची नेमणूक केलेली आहे.

  रक्तातील तांबड्या पेशी वगळून उर्वरित रक्तद्रव्य म्हणजे प्लाझमा. कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तीच्या रक्तातील प्लाझमा २८ दिवसांनंतर रोगप्रतिकार क्षमता कमी असेल अशा व्यक्तीच्या शरीरात दिल्यास प्लाझमामुळे त्यांच्या अँटिबॉडीज वाढतात व रोगप्रतिकार क्षमता वाढून विषाणूची तीव्रता कमी होण्यास मदत होते.

  योग्य वेळी योग्य रूग्णाला प्लाझमा देण्यात आल्यास त्याचे महत्त्व मोठे आहे. त्यामुळे रक्तदानाइतकेच प्लाझमा दान हे देखील श्रेष्ठ दान १८ वर्षावरील व ६० वर्षापेक्षा कमी असलेल्या कोरोनामधून बरे झालेल्या व्यक्तींना प्लाझमा दान करता येत असून प्लाझमा दान करण्यापूर्वी दात्याच्या क्षमतेबाबत खात्री करण्यात येते.

  ही अत्यंत सुरक्षित व सोपी पध्दत असून त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या आरोग्य संरक्षणासाठी महत्त्वाची मदत होऊ शकते. त्यामुळे कोविड उपचारांकरिता रूग्णालयीन सुविधा उपलब्ध करून देण्याप्रमाणेच पोस्ट कोविड सेंटर सोबतच प्लाझमा दान करण्यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करणे व प्लाझमाची आवश्यकता असलेल्या नागरिकांपर्यंत तो पोहचविणे याकडेही नवी मुंबई महानगरपालिकेने विशेष लक्ष देण्यास सुरूवात केलेली आहे.

  प्लाझमा विषयक कार्यवाही करिता डॉ. प्रिती संगानी यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली असून प्लाझमा दान करू इच्छिणाऱ्या व्यक्तींना याबाबत काही विचारणा करावयाची असल्यास महानगरपालिकेच्या ०२२-२७५६७४६० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधा असे सूचित करण्यात येत आहे.

  तरी कोरोना होऊन गेलेल्या नागरिकांनी २८ दिवसांनंतर स्वत:हून पुढे येऊन प्लाझमा दान करण्यासाठी पुढाकार घ्यावा व इतर नागरिकांच्या आरोग्य संरक्षणात आपले योगदान द्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.