drunk and drive

मद्यधुंद अवस्थेत(drunk and drive) ३१ डिसेंबर रोजी वाहन चालवताना ठाणे वाहतूक पोलिसांनी(thane traffic police) विटावा नाका येथे पकडलेल्या एका वाहनचालकासह सहप्रवाशाला ठाणे न्यायालयाने सात दिवसांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

ठाणे : मद्यधुंद अवस्थेत(drunk and drive) ३१ डिसेंबर रोजी वाहन चालवताना ठाणे वाहतूक पोलिसांनी(thane traffic police) विटावा नाका येथे पकडलेल्या एका वाहनचालकासह सहप्रवाशाला ठाणे न्यायालयाने सात दिवसांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. न्यायालयाने या दोघांना सुरुवातीला १० हजार रुपये दंड ठोठावला होता. मात्र, ही रक्कम भरता न आल्याने त्यांची रवानगी तुरूंगात करण्यात आली. विशेष म्हणजे सहप्रवाशाने मद्य प्राशन केलेले नव्हते. मात्र मद्यपी वाहन चालकासोबत प्रवास केला म्हणून त्यालाही गजाआड(arrest) जावे लागले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३१ डिसेंबरच्या रात्री मद्यधूंद अवस्थेत वाहन चालविणाऱ्यांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे होणारे संभाव्य अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी केली होती. त्या रात्री तब्बल ४१६ मद्यपी वाहनचालक आणि २०७ सहप्रवाशांवर पोलिसांनी कारवाई केली. रात्री ९ वाजण्याच्या सुमारास विटावा चौकी येथे बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस पथकाने एका मोटारसायकलस्वाराला रोखले होते. वाहनचालक मद्यधुंद अवस्थेत होता. तर, सहप्रवाशाने मद्य प्राशन केले नसल्याचे तपासणीत निष्पन्न झाले होते. पोलिसांनी मोटार वाहन कायद्याचे कलम १८५ अन्वये मद्यपी वाहनचालकावर कारवाई केली. तर, वाहनचालक मद्यधूंद असतानाही त्याच्यासोबतच प्रवास करणे हा कलम १८८ अन्वये गुन्हा ठरतो. त्यामुळे या या दोघांवर पोलिसांनी कारवाई केली. न्यायालयाने त्यांना प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. परंतु, दंडाची ही रक्कम दोघांनीही भरली नाही. त्यामुळे त्यांची रवानगी तळोजा कारागृहात केल्याची माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.

२२ जणांना प्रत्येकी १० हजार रुपये दंड

मोटार वाहन कायद्याचे कमल १८५ आणि १८८ अन्वये मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविणे किंवा अशा चालकासोबत प्रवास करणे यासाठी किमान दोन हजार रुपये दंड किंवा ६ महिने कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. मात्र ३१ डिसेंबरच्या रात्री कळवा वाहतूक शाखेने पकडलेल्या १७ वाहनचालक आणि सात सहप्रवाशांना न्यायालयाने प्रत्येकी १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली होती. कारागृहात रवानगी झालेल्या दोघांना वगळता उर्वरित २२ जणांनी दंडाची रक्कम भरली आहे. दंडात्मक कारवाई किंवा कारावास यांसारखी अप्रिय कारवाई टाळण्यासाठी मद्य प्राशन करून वाहन चालवू नये किंवा अशा वाहनचालकांसोबत प्रवास करू नये असे आवाहन उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.