हळदी समारंभांचा फायदा घेत नातेवाईक महिलेसह आईवर प्राणघातक हल्ला

कल्याण पश्चिमेतील सापर्डे गावात रात्री बाराच्या सुमारास हळदी समारंभ सुरू होता. गावातील लोक या कार्यक्रमात व्यस्त होते. याच दरम्यान सुरु असलेल्या हळदी कार्यक्रमापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या घरात आरोपी पवन जगदीश म्हात्रे याने गोळीबार केल्याने या प्राणघातक हल्यात नातेवाईक सुवर्णा गोडे (३६) या महिलेचा जागीच मृत्यू झाला.

  • नातवाईक महिलेचा मृत्यू तर आई गंभीर जखमी
  • गुन्हा लपविण्यासाठी आरोपीने केला लुटमार झाल्याचा बनाव

कल्याण : शेजारी हळदीचा कार्यक्रम सुरु असल्याचा फायदा घेत नातवाईक महिलेसह आपल्या आईवर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना कल्याण मधील सापर्डे गावात घडली आहे. या हल्ल्यात नातेवाईक महिलेचा मृत्यू झाला आहे. तर आरोपीची आई गंभीर जखमी असल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे गुन्हा लपविण्यासाठी आरोपीने लुटमार झाल्याचा बनाव करत स्वतः देखील जखमी असल्याचे भासवले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पवन म्हात्रे विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

कल्याण पश्चिमेतील सापर्डे गावात रात्री बाराच्या सुमारास हळदी समारंभ सुरू होता. गावातील लोक या कार्यक्रमात व्यस्त होते. याच दरम्यान सुरु असलेल्या हळदी कार्यक्रमापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या घरात आरोपी पवन जगदीश म्हात्रे याने गोळीबार केल्याने या प्राणघातक हल्यात नातेवाईक सुवर्णा गोडे (३६) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर भारती म्हात्रे ह्या गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आरोपीने आमच्यावर हल्ला झाल्याचा बनाव करीत जखमी झाल्याचे दर्शवित सकाळी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे दर्शविले अखेर पोलिसांनी या गुन्ह्यांची २४ तासात उकल करीत आरोपी पवन यांस जेरबंद केले.

दरम्यान अनैतिक संबंधातून ही घटना घडल्याचा पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघड झाले असून हत्येमागे नेमके काय कारण होते याचा अधिक तपास पोलीस करत असल्याचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी सांगितले.