अॅट्रोसिटीचा खटला मागे घेण्यासाठी फिर्यादीच्या घरावर हल्ला –  टोकावडे पोलिसांनी अन्यायग्रस्तांवर दाखल केला गुन्हा ?

मुरबाड: अॅट्रोसिटीचा कोर्टात सुरू असलेला खटला मागे घेण्यासाठी फिर्यादीच्या घरावर हल्ला करून त्या कुटुंबास जबर मारहाण केल्याची घटना तालुक्यातील मिल्हे येथे घडली आहे. या घटनेत टोकावडे पोलिसांनी पाच

मुरबाड: अॅट्रोसिटीचा कोर्टात सुरू असलेला खटला मागे घेण्यासाठी फिर्यादीच्या घरावर हल्ला करून त्या कुटुंबास जबर मारहाण केल्याची घटना तालुक्यातील मिल्हे येथे घडली आहे. या घटनेत टोकावडे पोलिसांनी पाच आरोपींवर गुन्हा नोंदवला आहे. मात्र यात हल्ला झालेल्या दलित वस्तीतील अन्यायग्रस्त लोकांवरही गुन्हा नोंदवल्याने पोलिसांचा कारभार चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

तालुक्यातील आर.पी.आय.युवकचे अध्यक्ष आण्णा साळवे यांच्यावर झालेल्या अन्यायाप्रकरणी काही जातीयवादी गावगुंडांवर कोर्टात खटला सुरू आहे. हा खटला मिटविण्यासाठी साळवे यांच्यावर वेळोवेळी दबाव येत होता. शुक्रवारी या खटल्यातील आरोपींनी साळवे यांच्या मिल्हे दलित वस्तीत घुसून त्यांच्या घरावर हल्ला केला. त्यांचा भाऊ व भावजईस लोखंडी सळई, दांडक्याने मारहाण करून हा खटला मागे न घेतल्यास कुटुंबाला संपविण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी टोकावडे पोलिसांनी संभाजी घावट, हेमंत घावट, मंगल घावट, सखाराम घावट, दिनेश घावट यांच्यावर अॅट्रोसिटीचा व  मारहाणीचा गुन्हा नोंदवला आहे.यातील चार आरोपींवर व त्यांच्या नातेवाईकांवर याआधीच अॅट्रोसिटीचा खटला सुरू आहे. विशेष म्हणजे या प्रकरणी हल्ला झालेल्या दलित वस्तीतील लोकांवरही मारहाणीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे, त्यामुळे टोकावडे पोलिसांचा हा कारभार म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार असल्याच्या प्रतिक्रिया लोकांकडून व्यक्त होत आहेत.

या घटनेची माहिती मिळताच आर.पी.आय.तालुका अध्यक्ष दिनेश उघडे यांनी घटनास्थळी धाव घेतली व तेथील रहिवाशांना आधार दिला. दलित वस्त्यांवर असे होणारे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला आहे. तर पोलिसांनी जातीयवादी आरोपींना तत्काळ अटक करावी, पोलिसांच्या संशयास्पद कारभाराचीही वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी फिर्यादीवर दबाव आणल्याने पोलिसांवर कारवाई न झाल्यास आर.पी.आय.ने आंदोलनाचा इशारा दिला आहे.