अधिकाऱ्यांवरील हल्ले खपवून घेणार नाही, मंत्री एकनाथ शिंदे यांचे कडक कारवाईचे पोलीसांना आदेश

ठाणे महानगरपालिकेच्या ओवळा-माजीवडा प्रभागाच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे या माजीवडा परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या असताना तिथे असलेल्या अमर्जीत यादव या फेरीवल्याने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांची 2 बोटे आणि त्यांच्या अंगरक्षकाचे 1 बोट तुटले. त्यानंतर त्याना तातडीने वेदांत रुग्णालयात आणि त्यानंतर ज्युपिटर रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

    ठाणे – “अधिकाऱ्यांवर होणारे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत, कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरावर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.” अशी माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. फेरीवाल्याच्या हल्ल्यात आपली तीन बोटे गमवावी लागलेल्या ओवळा-माजीवडा प्रभागाच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे यांची त्यांनी ज्युपिटर रुग्णालयात जाऊन चौकशी केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ही बाब स्पष्ट केली.

    ठाणे महानगरपालिकेच्या ओवळा-माजीवडा प्रभागाच्या अतिरिक्त आयुक्त कल्पिता पिंपळे या माजीवडा परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या असताना तिथे असलेल्या अमर्जीत यादव या फेरीवल्याने त्यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांची 2 बोटे आणि त्यांच्या अंगरक्षकाचे 1 बोट तुटले. त्यानंतर त्याना तातडीने वेदांत रुग्णालयात आणि त्यानंतर ज्युपिटर रुग्णालयात दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.

    रात्री उशिरा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्युपिटर रुग्णालयात जाऊन पिंपळे आणि त्यांच्या अंगरक्षकाच्या तब्येतीची विचारपूस केली. तसेच त्यांचा उपचाराचा सर्व खर्च महानगरपालिकेतर्फे केला जाईल याबाबत त्यांना आशवस्त केले.

    अधिकाऱ्यांवर त्यातही महिला अधिकाऱ्यावर हल्ला होण्याची अशी ही शहरातील पहिलीच घटना असून ती अतिशय निंदनीय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अधिकाऱ्यांवर अशाप्रकारे होणारे हल्ले कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाहीत. या प्रकरणातील दोषी फेरीवाल्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना दिले असल्याचे मंत्री शिंदे यांनी सांगितले.

    ठाणे महानगरपालिकेने गेल्या काही दिवसांपासून शहरातील फेरीवल्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली असून त्या कारवाईला खीळ बसावी या उद्विग्नतेतून अशी घटना घडली असल्याची शक्यता आहे. मात्र असं असलं तरीही ही कारवाई मागे न घेता यापुढेही अनधिकृत फेरीवाल्याविरोधात धडक कारवाई सुरूच ठेवणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.