भोपाळ मधील अट्टल चोरटयास कल्याण पोलिसांकडून अटक; आरोपीला मध्यप्रदेश पोलिसांच्या केले स्वाधीन

कोतवाली पोलीस स्टेशन भोपाळ, मध्यप्रदेश येथे नोंद असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यात आरोपी जाफर उर्फ चौहाण युसुफ जाफरी रा. इराणीवस्ती, आंबिवली कल्याण हा मिळून येत नसल्याने पोलीस उप महानिरीक्षक, रेंज भोपाळ यांनी २२ जून २०२० रोजी भोपाळ पोलीस रेग्युलेशन पैरा ८०(ए) प्रमाणे, त्यास पकडून देणाऱ्यास १० हजार रू. बक्षीस घोषित केले.

    कल्याण : मध्यप्रदेश येथील भोपाळ मधील एका जबरी चोरीच्या आरोपीला पकडण्यात खडकपाडा पोलिसांना यश आले असून या आरोपीला आज मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती कल्याणचे सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली आहे.

    कोतवाली पोलीस स्टेशन भोपाळ, मध्यप्रदेश येथे नोंद असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यात आरोपी जाफर उर्फ चौहाण युसुफ जाफरी रा. इराणीवस्ती, आंबिवली कल्याण हा मिळून येत नसल्याने पोलीस उप महानिरीक्षक, रेंज भोपाळ यांनी २२ जून २०२० रोजी भोपाळ पोलीस रेग्युलेशन पैरा ८०(ए) प्रमाणे, त्यास पकडून देणाऱ्यास १० हजार रू. बक्षीस घोषित केले. त्यानुसार त्यांनी परिमंडळ-३ पोलीस उप आयुक्त, कल्याण यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता.

    त्या अनुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलिसांनी सप्टेंबर २०२० पासून मोहीम राबवून, अथक प्रयत्न करून ६ एप्रिल रोजी आंबिवली इराणी वस्तीतून ताब्यात घेवून उल्लेखनीय कामगीरी केली आहे. या आरोपीस कोतवाली पोलीस स्टेशन भोपाळ, मध्यप्रदेश यांच्या ताब्यात दिले आहे. ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस उप. आयुक्त विवेक पानसरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार, व.पो.नि. अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक योगेश गायकर, पो.ह. जितेंद्र ठोके, पो.कॉ. विनोद चन्ने, दिपक थोरात, अशोक आहेर, सुरेश बडे व राजाराम गामणे यांनी केली आहे.

    आंबिवली येथील इराणी वस्तीमध्ये आरोपींना पकडण्यास जाणाऱ्या पोलिसांवर अनेकवेळा हल्ला झालेला असताना देखील, खडकपाडा पोलिसांनी सप्टेंबर २०२० पासुन ते दिनांक ०६ एप्रिल पर्यंत इराणी वस्तीतील चैनस्नॅचर, जबरी चोरी, घरफोडी, फसवणुक आदी गुन्हयातील पाहिजे असलेल्या आरोपींना पकडुन महाराष्ट्र राज्यातील भिवंडी, ठाणे ग्रामिण, मिरा-भाईदर, रायगड, नाशिक शहर, मुंबई शहर येथील एकुण १५ आरोपी पकडून दिलेले असून राज्याबाहेरील मध्यप्रदेश-१, हरयाणा-२, कर्नाटक-१ असे एकणु ४ आरोपींना पकडून दिले आहे. तसेच वेगवेगळया राज्यातून येणाऱ्या पोलीस पथकास इराणी आरोपींना पकडण्यास वेळोवेळी शर्थीचे प्रयत्न खडकपाडा पोलीस करीत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली.