MNS also opposes naming Navi Mumbai airport after Balasaheb Thackeray

पनवेलमधील उलवे येथे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे(Navi Mumbai International Airport) काम वेगात सुरू आहे. २०१४-१५ मध्ये विमानतळाच्या कामाला सुरुवात झाली होती. गेल्या नोव्हेंबर २०२० पासून या विमानतळाच्या नावावरून राजकारण ढवळून निघण्यास सुरूवात झाली.

  नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला(Navi Mumbai International Airport) स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे(Balasaheb thakre) यांचे नाव देण्याबाबतचा प्रस्ताव सिडको संचालक मंडळाच्या बैठकीत एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात मंजूर करण्यात आला आहे.

  गेल्या आठवड्यात हा प्रस्ताव राज्य सरकारच्या मंजूरीसाठी पाठवण्यात आला असून, या वृत्ताने ठाणे व रायगड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांमध्ये प्रचंड नाराजी पसरली असून, पुन्हा एकदा येथील भूमिपुत्र सिडको विरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे.

  पनवेलमधील उलवे येथे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम वेगात सुरू आहे.
  २०१४-१५ मध्ये विमानतळाच्या कामाला सुरुवात झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते.

  पहिल्या टप्प्यात १६ हजार कोटी रुपये विमानतळासाठी खर्च अपेक्षित करण्यात आला. त्यामध्ये शेतकऱ्यांचे पुर्नवसन, उलवे नदीच्या प्रवाहात बदल करणे, टाटा पॉवरचे स्थलांतर, आवश्यक केंद्र आणि राज्य सरकारच्या लागणाऱ्या विविध परवानग्या यांचा समावेश होता.

  सद्यस्थितीत विमानतळाचे पहिल्या टप्प्यातील विकास कामे पूर्ण झाली आहेत. तत्कालीन सिडको एमडी भूषण गगराणी, लोकेश चंद्र यांच्या काळात विमानतळाच्या कामाला गती आली होती. विद्यमान सिडको उपाध्यक्ष डॉ. संजय मुखर्जी यांनी विमानतळ जागेची पाहणी करून सविस्तर माहिती घेऊन प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावले.

  गेल्या नोव्हेंबर २०२० पासून या विमानतळाच्या नावावरून राजकारण ढवळून निघण्यास सुरूवात झाली.नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानतळाला स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.

  मात्र या वृत्ताने ठाणे, रायगड जिल्हयातील प्रकल्पग्रस्त आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते. समाज माध्यमांमध्ये त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. प्रकल्पग्रस्तांचे नेते स्वर्गीय दि.बा.पाटील यांचे नाव देण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांच्या संघटनेने केली होती.

  अनेकांनी तसे फलकदेखील समाजमाध्यमांवर झळकावले होते. दि. बा. पाटील यांच्यासह, पनवेल तालुक्यातील शिरढोण येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके यांचे नाव देण्याची मागणी शिरढोणमधून करण्यात आली होती. दि. बा पाटील यांचे नावदेण्याबाबत नवी मुंबईतून थेट पंतप्रधान कार्यालयाला पत्रव्यवहार करण्यात आला होता.

  भूमीपुत्रांकडून आक्रमक पवित्रा

  नवी मुंबईत सिडकोने कमी किमतीत जमिनी घेतल्यावर भूमिपुत्रांनी त्याविरोधात लढा उभारला होता. स्व. दि. बा. पाटील यांनी याविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले होते. सरकारविरोधात लढा दिला होता. अखेर शासनाला नमते घेत प्रकल्पग्रस्तांसाठी साडेबारा टक्के भूखंडाची योजना आणावी लागली होती. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांसाठी दि. बा. पाटील हे म्हणजे दैवत झालेले आहे.

  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला मुहूर्त मिळताच असंख्य प्रकल्पग्रस्तांनी व त्यांच्या संघटनांनी विमानतळाला स्व. दि. बा. पाटील हे नाव देण्यात यावे, अशी मागणी आजतागायत केली जात आहे.त्यात स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा मुद्दा पुन्हा उपस्थित होताच त्याचे पडसाद समाजमाध्यमांवर उमटायला सुरुवात झाली असून जमिनींसाठी सुरू असलेला भूमिपुत्र विरुद्ध सिडको हा लढा आता नामांतरांपर्यंत पोहोचला आहे.