शहापूर – मुरबाड वाहतुकीत अडथळा – भाकरवाडी पूलाचे काम अद्याप अपूर्ण

शहापूर :शहापूर तालुक्यातील सरळगाव- किनवली रस्त्यावर भाकरवाडी पूलाचे काम सुरू आहे. पूलाच्या कामात दिरंगाई झाल्यामुळे पहिल्याच पावसात दोन दिवस नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला

शहापूर :शहापूर तालुक्यातील सरळगाव- किनवली रस्त्यावर भाकरवाडी पूलाचे काम सुरू आहे. पूलाच्या कामात दिरंगाई झाल्यामुळे पहिल्याच पावसात  दोन दिवस नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला .पावसाळ्याच्या तोंडावर हा प्रमुख मार्ग बंद होऊ नये याकरिता माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी चार ते पाच दिवसांमध्ये पूल वाहतुकीस खुला करण्याची तंबी प्रोजेक्ट इंजिनीअरना दिली आहे.

अन्यूटी हायब्रीड प्रकल्पांतर्गत शहापूरला जोडणाऱ्या किनवली- सरळगाव या प्रजिमा क्रमांक ६४ वर संगमेश्वरजवळ भाकरीवाडी येथे पुलाचे काम सुरू आहे. हा पूल मार्चमध्ये तोडण्यात आला होता. त्यानंतर लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर काम बंद होते. एप्रिलमध्ये कामाला परवानगी मिळाल्यानंतर धीम्या गतीने काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने तकलादू पर्यायी मार्ग तयार केला होता. मात्र पावसाळा सुरुवात झाल्यानंतर हा पर्यायी रस्ता पाण्याकडे जाऊ लागला असून पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहनचालकांना अनेक तास उतरण्याची वाट पाहात थांबावे लागते. शेंद्रुण ठिळे रस्त्यावरील रखडलेल्या पूलामुळे मुरबाड- शहापूर त्या मार्गावरील वाहतूक बंद आहे. कोचरे पूलही वारंवार पाण्याखाली जात असल्याने सरळगाव- किन्हवली हा एकमेव रहदारीचा मार्ग उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत पुलाचे लांबलेल्या काम वेळेवर पूर्ण न झाल्यास शहापूर मुरबाडचा संपर्कात अडथळा होईल. याची दखल घेत  माजी आमदार बरोरा यांनी भाकरीवाडी पूलाच्या ठिकाणी  भेट देऊन कामाची पाहणी केली कामाचा दर्जा व होत असलेल्या विलंबामुळे प्रोजेक्ट इंजिनीयरला येत्या चार-पाच दिवसात पूल वाहतुकीस खुला करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप दळवी यांच्याशी संपर्क करून या कामात वैयक्तिक लक्ष घालण्यास सांगितले. दरम्यान ठेकेदाराने या पूलाचे काम आता पूर्णत्वात आले असून या पूलाचे क्युरिंग पिरियड संपल्यानंतर वाहनांसाठी खुले करणार असल्याचे ठेकेदारांकडून संदेश पाठविण्यात आला आहे.

ठेकेदाराने भाकर वाडी पूल तोडल्यानंतर योग्य पर्यायी रस्ता न बनवल्याने पाऊस पडताच वाहतूक बंद होण्याची नामुष्की ओढवली आहे. लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. – पांडुरंग बरोरा माजी आमदार