भिवंडीत भूमिअभिलेख कार्यालयात दलालांचा सुळसुळाट ; कारवाईची मागणी

भिवंडी :भिवंडी शहरातील राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात उपअधीक्षक म्हणून रुजू झालेले प्रवीण ठुबे यांनी कार्यभार स्विकारल्यापासून ते नियमितपणे

भिवंडी :भिवंडी शहरातील राज्य शासनाच्या महसूल विभागाच्या अखत्यारीत येत असलेल्या उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात उपअधीक्षक म्हणून रुजू झालेले प्रवीण ठुबे यांनी कार्यभार स्विकारल्यापासून ते नियमितपणे कार्यालयात येत नसल्याने कार्यालयीन अंतर्गत कामकाजावर कुणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. त्यामुळे या कार्यालयात दलालांचा सुळसुळाट वाढला आहे .या घटनेस येथील सर्वच कर्मचारी जबाबदार असल्याने त्यांच्या त्वरित बदल्या करण्यात याव्यात अशी मागणी महाराष्ट्र कोकण मुस्लिम मंडळाचे अध्यक्ष इरफान पटेल यांनी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
 भिवंडीतील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात उपअधीक्षक म्हणून प्रवीण ठुबे हे गेल्या वर्षी येथे रुजू झाले आहेत.तेव्हापासून ते महिन्यातून फक्त तीन ते चार वेळा कार्यालयात हजर राहत आहेत. त्यांच्या या अनियमिततेमुळे नागरिकांच्या  जागेची मोजणी, जमिनीच्या विक्री प्रकरणी फेरफार, गटबुक नकाशा ,बुलेट ट्रेन ,मुंबई अहमदाबाद महामार्गबाबत शेतकऱ्यांच्या जमीन मोजणीच्या तक्रारी आदी कामे मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहेत. जमीन मोजणीची प्रलंबित कामे करून घेण्यासाठी शेतकरी,कंपनीधारक दलालांमार्फत जमिनीची मोजणी करून घेतात व या कार्यालयातून मोजणी नकाशावर सही,शिक्के मारून भूमिअभिलेख कार्यालयाचा अधिकृत नकाशा आहे असे भासवून दलाल गडगंज पैसे उकळत आहेत.या सर्व घटनांना कार्यालयीन कर्मचाऱ्यांचा आशिर्वाद आहे.त्यामुळे येथील सर्व कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात याव्यात व कार्यालय दलालमुक्त करावे अशी मागणी इरफान पटेल यांनी केली आहे.