भिवंडीत कोविड रुग्णालय उभारणीत कोट्यवधींचा भष्टाचार; सभागृह नेत्यावर कारवाईची मागणी

भिवंडी: इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांवर योग्य उपचार मिळत नसून रुग्णालयाच्या अवस्थेसह उपचाराचा दर्जाही घसरला. त्यामुळे मृत्यूच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत असून शहरात

 भिवंडी: इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांवर योग्य उपचार मिळत नसून रुग्णालयाच्या अवस्थेसह उपचाराचा दर्जाही घसरला. त्यामुळे  मृत्यूच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत असून  शहरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हजाराच्या पार गेल्याचे  कारण पुढे करून पोगाव येथे ३५० बेड्चे नवीन कोविड रुग्णालय उभारण्यात येत आहे. मात्र याठिकाणी रुग्णालय उभारणीत महापौरांचा पती तथा सभागृह नेते विलास पाटील यांनी कोट्यवधीची कामे चढ्या दराने मंजूर करून  कोट्यवधीचा भष्टाचार करीत असल्याचा आरोप एएमआयएमएचे जिल्हाध्यक्ष खालीद गुड्डू यांनी केला असून याप्रकरणी जिल्हा अधिकाऱ्यांसह महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार करून पालिकेचे सभागृह नेत्यावर कारवाईची मागणी केली आहे.    

राज्य शासनाच्या इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटरसह अनेक बाबींचा तुडवडा व योग्य उपचार रुग्णांवर होत नसल्याने दिवसागणिक मृत्यूचा आकडा वाढत आहे. असे असताना तत्कालीन आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांच्याशी संगमत करून पोगाव येथे घाईघाईने ३५० बेडचे कोविड रुग्णालय उभारण्याची मान्यता घेतली. मात्र याठिकाणी कोविड रुग्णालयाच्या उभारणीत मोठ्या प्रमाणात कामे आपल्याच मर्जीतील ठेकेदारांना देऊन पालिकेचे सभागृह नेते यांनी कोट्यवधींचा भष्टाचार करीत असल्याने त्यांची  व त्यांच्यासोबत असलेल्या पालिका अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी. यासाठी एएमआयएमएचे जिल्हाध्यक्ष खालीद गुड्डू यांनी जिल्हा अधिकाऱ्यांसह महापालिका आयुक्तांकडे संबंधित कामाची चौकशी करून कारवाईच्या मागणीसाठी लेखी तक्रार दिली आहे.