भिवंडी तालुक्यातील कोरोना रुग्णांना करावा लागतो खासगी रुग्णालयात उपचार

भिवंडी: भिवंडीत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भिवंडी शहराबरोबरच ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येतदेखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. भिवंडी शहर व ग्रामीण

 भिवंडी: भिवंडीत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. भिवंडी शहराबरोबरच ग्रामीण भागातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येतदेखील मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. भिवंडी शहर व ग्रामीण भागात एकूण १४७१ हुन अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून यात ग्रामीण भागातील ४२६ रुग्णांचा समावेश आहे. भिवंडीत मागील काही दिवसांपासून शराबरोबरच ग्रामीण भागातील रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ होत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे ग्रामीण भागातील कोरोना रुग्णांना शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार मिळत नसल्याने खासगी रुग्णालयात उपचार करावे लागत आहे. मात्र खासगी रुग्णालयांमध्ये एका रुग्णासाठी तब्बल १ ते ३ लाखापर्यंत खर्च येत असल्याने ग्रामीण भागातील रुग्णांची मोठ्या संख्येने परवड होत असून ऐन लॉकडाऊनच्या काळात कोरोनाच्या उपचारावर लाखाचा खर्च करावा लागत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांवर मोठे आर्थिक संकट ओढवले आहे. त्यातच ज्या कोरोनाबाधित रुग्णाच्या परिवारातील नागरिकांना दवखील कोरोनाची बाधा झाली तर त्या प्रत्येक व्यक्तीचे खासगी रुग्णालयाचे भरमसाठ बिल कसे भरावे असा प्रश्न कोरोनाबाधित रुग्णांना सतावत आहे. 

 भिवंडीत स्व इंदिरागांधी उपजिल्हा रुग्णालय हे कोविड रुग्णालय घोषित झाले असून सध्या मनपाच्या कार्यकक्षेत हे रुग्णालय आहे. १०० बेडची रुग्ण व्यवस्था असलेल्या या रुग्णालयात मनपाच्या दुर्लक्षित कारभारामुळे या रुग्णालयात सेवा सुविधांचा बोजवारा उडाला आहे. या रुग्णालयात नागरिकांना योग्य व आवश्यक सोयीसुविधा मिळत नसल्याने नागरिकांना आपला जीव गमवावा लागत असल्याचे आरोप होत आहे. विशेष म्हणजे भिवंडीत आतापर्यंत ७९ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून यातील बहुसंख्ये मृत रुग्णांना या रुग्णालयाच्या गैरसोयीमुळे आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. मात्र रुग्णालयाच्या या दुर्दैवी प्रकाराकडे राज्यशासनासह मनपा प्रशासनाचे लक्ष का जात नाही असा प्रश्न येथील नागरिकांना पडत आहे. त्यातच कोविड रुग्णालय हे मनपाच्या अखत्यारीत असल्याने सध्या शहरातील रुग्णांनाच या रुग्णालयात उपचार मिळत नाही. त्यातच ग्रामीण भागातील रुग्णांसाठी या रुग्णालयात कोणतीच सोय राहिली नाही ग्रामीण भागातील सर्वच नव्या रुग्णांना कोरोनावरील उपचारासाठी थेट खासगी रुग्णालयात जावे लागत आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या मंदीच्या काळात ग्रामीण रुग्णांवर कोरोनाचे आर्थिक संकट देखील उभे ठाकले आहे. विशेष म्हणजे मागील चार महिन्यांपासून कोरोनाने देशात सर्वत्र थैमान घातले असतांनाहि भिवंडीतील ग्रामीण रुग्णांसाठी प्रशासनाने कोणतीच सोय केली नसल्याने ग्रामीण नागरिकांमध्ये प्रशासनाच्या या दुर्लक्षित कारभारावर प्रचंड संताप व्यक्त होत आहे. 

 दरम्यान भिवंडीतील ग्रामीण कोरोनाबाधित रुग्णांसाठी भिनार येथे ४०० बेडचे कोविड सेंटर उभारण्यात येणार असून त्यापैकी २०० बेड उपलब्ध झाले आहेत मात्र या कोविड सेंटरसाठी आवश्यक असलेले वैद्यकीय अधिकारी , नर्स , व कर्मचारी उपलब्ध झाले नसल्याने हे कोविड सेंटर अजूनही सुरु झाले नाही, याच प्रमाणे सावद येथेही कोविड सेंटर मंजूर झाले असल्याची माहिती मिळते आहे मात्र ते देखील सुरु नसल्याने ग्रामीण भागातील रुग्णांची मोठ्या प्रमाणात परवड होत असून प्रशासनाच्या हलगर्जीकारभरामुळे कोरोनाच्या उपचारासाठी ग्रामीण भागातील रुग्णांना लाखो रुपयांचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. अनेक रुग्ण उसनवारी व खासगी सावकाराकडून कर्ज घेऊन तर काही जण दागिणे गहाण ठेऊन रुग्णालयाचा बिल भरत असल्याची माहिती समोर येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या या कोरोनासंकटासह आर्थिक संकटावर प्रशासन मार्ग काढणार का असा सवाल ग्रामीण भागातील नागरिक विचारात आहेत.