मुंबईतून भिवंडीत परत आलेली महिला आणि तिच्या २ मुलांना कोरोनाची लागण

भिवंडी: भिवंडी शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून दुर्दैव म्हणजे शहरात आढळलेल्या सर्व रुग्णांना प्रवासाचा इतिहास आहे. त्यामुळे शहरात बाहेरून येणाऱ्यांना प्रवेश नाही

 भिवंडी: भिवंडी शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून दुर्दैव म्हणजे शहरात आढळलेल्या सर्व रुग्णांना प्रवासाचा इतिहास आहे. त्यामुळे शहरात बाहेरून येणाऱ्यांना प्रवेश नाही म्हणणाऱ्या पोलिसांची नाकाबंदी कुचकामी ठरली आहे असे बोलले जात आहे .भिवंडी शहरात आज ३ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांनी दिली आहे .

मुंबई दहिसर पूर्व येथे माहेर असलेली महिला एक महिना माहेरी वास्तव्य करून १५ एप्रिल रोजी भिवंडी शहरातील तांडेल मोहल्ला येथील सासरी घरी आपल्या दोन मुलांसोबत परतली. याची माहिती भिवंडी महानगरपालिका आरोग्य विभागास समजताच या तिघांना क्वारंटाईन करून त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी हाफकीन इन्स्टीट्यूट या ठिकाणी पाठविले असता महिला ३० वर्ष , मुलगा १२ वर्ष व मुलगी २ वर्ष या तिघांना कोरोना लागण झाल्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत तर त्यांच्या अति निकट संपर्कातील ७ जणांना टाटा आमंत्रण येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल केले असल्याची माहिती आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांनी दिली आहे .  या ३ रुग्णां व्यतिरिक्त वडाळा येथील महिला आपल्या तीन मुलांना घेऊन भिवंडी शहरातील गुलजार नगर येथील माहेरी १९ एप्रिल रोजी आली असता त्यांना क्वारंटाईन केल्यावर त्यापैकी ७ वर्षीय मुलगी ही करोना पॉझिटिव्ह आढळून आली असून तिच्या अति निकट संपर्कात आलेल्या २ व्यक्तींना सुध्दा टाटा आमंत्रण येथील क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल केले आहे .
 
शुक्रवारी आढळून आलेल्या ३ रुग्णांनंतर भिवंडी शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १० वर पोहचली असून मूळचे मुंबई निवासस्थान असलेले परंतु लॉक डाऊन काळात भिवंडी शहरात दाखल झालेले एकूण ३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले असून त्यांच्यावर स्वर्गीय इंदिरा गांधींस्मृती कोव्हिडं १९ रुग्णालयात उपचार सुरू असले तरी त्यांची नोंद मुळ वास्तव्याचे ठिकाण मुंबई येथे होणार असल्याची माहिती आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांनी दिली आहे .भिवंडी शहरात आढळलेल्या १० रुग्णांना प्रवासाचा इतिहास असून हे सर्व रुग्ण बाहेर गावाहून भिवंडी शहरात आल्यावर ते रुग्ण करोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आल्याने ,शहराची केलेली नाकाबंदी व त्यासाठी चोवीस तास असलेला पोलीस बंदोबस्त हा फोल ठरत असल्याचे बोलले जात असून जर या रुग्णांना शहरा बाहेरच रोखले असते तर शहरात एक ही रुग्ण आढळून आला नसता अशी प्रतिक्रिया नागरीक देत आहेत.या व्यतिरिक्त माहीम येथील पतिपत्नी व वडाळा येथील एक असे ३ रुग्ण हे मुळचे मुंबई येथील असून ते भिवंडी शहरातील नातेवाईकां कडे आले असता त्याची वेळीच माहिती महानगरपालिका आरोग्य विभागास कळल्याने या संशयित व्यक्तींना ताब्यात घेऊन तपासणी केल्याने पुढील संसर्ग टाळता आला आहे. तर ग्रामीण भागातील ८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण लक्षात घेता भिवंडीत १८ रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे उपविभागीय अधिकारी डॉ मोहन नलदकर यांनी दिली.