bhivandi corporation

भिवंडी: भिवंडी(bhivandi) महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय विभागातील(public health and medical department) प्रशासकीय अनियमितता व आर्थिक अपहार प्रकरणी(corruption) प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.विद्या शेट्टी यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी तत्कालीन महापौर जावेद दळवी यांनी शासनाकडे केली होती.

भिवंडी: भिवंडी(bhivandi) महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय विभागातील(public health and medical department) प्रशासकीय अनियमितता व आर्थिक अपहार प्रकरणी(corruption) प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.विद्या शेट्टी यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी तत्कालीन महापौर जावेद दळवी यांनी शासनाकडे केली होती. त्यामुळे त्यामुळे शासनाने गंंभीर दखल घेतली. भिवंडी पालिकेच्या मुख्य लेखा परिक्षकांमार्फत गोपनीय चौकशी करण्यात आली. त्यांनी दिलेल्या अहवालानुसार तत्कालीन प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ.विद्या शेट्टी यांच्यावर आयुक्तांनी  तातडीने कारवाई करावा. तसेच शासनाला अहवाल सादर करावा असे गोपनीय पत्र नुकतेच राज्याचे राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई विभागाचे सह संचालक महेश बोटले यांनी महापालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांना पाठविले आहे. मात्र राजकीय दबावामुळे महापालिका आयुक्त प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याने माजी महापौरांसह नगरसेवक तीव्र नाराज झाले आहेत.  राज्याचे मुख्यमंत्री व पालकमंत्री यांनी या बाबतीत सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

भिवंडी पालिकेची सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय विभागाअंतर्गत शहरात विविध ठिकाणी आरोग्य उपकेंद्र सुरू असून या आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रूग्णांसाठी शासनाने दरवर्षी औषधांचा पुरवठा केला आहे. त्यापैकी २०१५ – १६ पासून सन २०१८- १९ पर्यंत या विभागातील प्रशासकीय अनियमीतता व आर्थिक अपहार तसेच शासनाकडून आलेल्या औषधांच्या नोंदीचे स्टॉक रजिस्टर व अनेक महत्वाचे दस्ताऐवज गहाळ करून आर्थिक अपहार केल्याची तक्रार शिवसेना व नगरसेवकांनी महापौरांकडे केली होती. त्यामुळे तत्कालीन महापौर जावेद दळवी यांनी दखल घेत शासनाकडे तक्रार केली आहे.त्यांनी वैद्यकीय अधिकारी डॉ.विद्या शेट्टी यांच्यासह  कर्मचारी व आरोग्य विभागातील डॉक्टर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

याबाबत शासनाने पालिकेचे तत्कालीन आयुक्त मनोहर हिरे यांना या प्रकरणी गोपनीय चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. त्यामुळे आयुक्त हिरे यांनी पालिकेचे मुख्य लेखा परिक्षक कालिदास जाधव यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली. लेखापरिक्षक जाधव यांनी या प्रकरणी सखोल गोपनीय चौकशी करून सुनावणी घेतली असता शासनाकडून आलेल्या औषधांच्या नोंदीचे स्टॉक रजिस्टर व अनेक महत्वाचे दस्ताऐवज डॉ.शेट्टी यांनी सादर केलेले नाही. काही औषधे व दस्ताऐवज आगीमध्ये जळून खाक झाल्याचा बहाणा करण्यात आला आहे. मात्र याबाबत डॉ.शेट्टी यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केलेली नाही.तसेच शासनाकडील सिव्हिल हॉस्पिटल ,डी.डी.ऑफिस ,डी.एच.ए.ऑफिस क्षयरोग ऑफिस पुणे आदींकडून आलेल्या लाखो रूपयांच्या औषधसाठा तसेच जन्म ,मृत्यू दाखल्यांबाबत प्रशासकीय अनियमीतता व आर्थिक अपहार प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ. शेट्टी यांच्यासह अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांची सुनावणी घेतली असता ते समाधानकारक उत्तर देऊ शकलेले नाहीत.

या कारणांमुळे पालिकेचे मुख्य लेखा परिक्षक कालिदास जाधव यांनी गोपनीय चौकशी तपास अहवाल तयार करून राज्य शासनाचा आरोग्य विभागाकडे पाठवून दिला.  या अहवालाची पडताळणी करून राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई विभागाचे सह संचालक महेश बोटले यांनी महापालिका आयुक्त डॉ. पंकज आशिया यांना लेखी पत्र पाठवून अपहार प्रकरणी वैद्यकीय अधिकारी डॉ.शेट्टींवर कारवाई करून अहवाल सादर करावा असे आदेश दिले आहेत. मात्र आयुक्त डॉ. आशिया यांच्यावर राजकीय दबाव आल्याने गेल्या दिड महिन्यापासून शासकीय आदेश गुंडाळून ठेवण्यात आले आहेत.  पालिका प्रशासनाकडून कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्हयाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी या बाबतीत सखोलपणे चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी शिवसेना नगरसेवक व तक्रारदार माजी महापौर नगरसेवक जावेद दळवी यांनी केली आहे.