भिवंडीत गरिबांच्या जीवनावश्यक वस्तूंच्या अपहार प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

भिवंडी: कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र त्यामुळे सर्वच जनतेची रोजीरोटी बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी ओढवली आहे.ही उपासमार

 भिवंडी: कोरोना व्हायरसचा  प्रादुर्भाव वाढल्याने सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र त्यामुळे सर्वच जनतेची रोजीरोटी बंद झाल्याने त्यांच्यावर उपासमारीची पाळी ओढवली आहे.ही उपासमार टाळण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत  नागरिकांसाठी स्वस्त धान्य शिधावाटप दुकानांमार्फत मोफत जीवनावश्यक वस्तूंचा  पुरवठा करून नागरिकांना दिलासा दिला आहे. मात्र असे असताना शहरातील निजमपुरा येथील अधिकृत सरकारी शिधावाटप दुकान क्र.३७ (फ) २२५ या दुकान चालकांनी शिधाजिन्नस तांदूळ,गहू,चनाडाळ व तूरडाळ आदी जीवनावश्यक वस्तूंचे ग्राहकांना वाटप न करताच त्यांची परस्पर विक्री करून अपहार केला. याबाबत शिधापत्रिकाधारकांनी अन्न पुरवठा विभागाकडे तक्रारी केल्या असता पुरवठा अधिकारी किरण गवांदे यांनी पुरवठा पथकाच्या मदतीने शिधावाटप दुकानाची तपासणी केली असता शासनाकडून प्राप्त झालेल्या ७६ हजार ५५१ रूपये किमतीचे तांदूळ ,गहू ,चनाडाळ व तुरडाळ आदी जीवनावश्यक वस्तूंचा अपहार झाल्याचे आढळून आले आहे. यामध्ये प्रियदर्शनी महिला स्वयंसहायता बचत गटाच्या अध्यक्षा यमुनाबाई मुरलीधर मुंडे व राजेश केशव राऊत यांनी संगनमताने हे कृत्य केल्याचे उघडकीस आल्याने पुरवठा अधिकारी किरण गवांदे यांनी या दोघांच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास एपीआय राज माळी करीत आहेत.