भिवंडीत कोरोना व्यतिरिक्त आजारी रुग्णांची परवड

भिवंडी:सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या संकटाला सर्वच नागरिक तोंड देत आहेत. एकिकडे वैद्यकिय क्षेत्रातील डॉक्टरांचे नागरिक कौतुक करीत आहेत तर दुसरीकडे खासगी डॉक्टर कोरोना

 भिवंडी:सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाच्या संकटाला सर्वच नागरिक तोंड देत आहेत. एकिकडे वैद्यकिय क्षेत्रातील डॉक्टरांचे नागरिक कौतुक करीत आहेत तर दुसरीकडे खासगी डॉक्टर कोरोना व्यतिरिक्त इतर आजार जडलेल्या रुग्णांवर उपचार करण्यास अथवा त्यांना उपचारासाठी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यास नकार देत असल्याची घटना भिवंडीत राजरोसपणे घडत आहे. खासगी डॉक्टरांच्या या मनमानी कारभारामुळे हृदय विकारासह अन्य आजारांनी नागरिकांचे प्राण मोठ्या प्रमाणात जात आहेत. त्यातच ज्या रुग्णांना कोरो कोरोना सदृश्य लक्षणे आढळली असतील अशा रुग्णांची तर या खासगी रुग्णालयांकडून मोठी परवड होत आहे. मनमानी कारभार करणाऱ्या या खासगी रुग्णालयांवर मनपा प्रशासनाचे कोणतेही नियंत्रण नाही. मनपा प्रशासन वारंवार नोटीस अथवा आवाहन करून खासगी रुग्णालयांना समज देण्याचा प्रयत्न करतात मात्र त्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. 

भिवंडी शहराचा विचार करता १२ लाखाहून अधिक लोकसंख्या व कामगार असलेल्या शहरामध्ये नागरिकांना कोरोनाव्यतिरिक्त आजारपणात सुविधा देणे मनपाचे आद्य कर्तव्य आहे. येथील स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालय कोविड रुग्णालय घोषित केल्यानंतर मनपाच्या पाच प्रभागांमध्ये प्रत्यक प्रभागात एक असे पाच फिवर क्लिनिक मनपाने सुरु केले आहेत. याव्यतिरिक्त शहरातील धामणकर नाका येथे असलेल्या एकमेव ऑरेंज हॉस्पिटलमध्येच कोरोनाव्यतिरिक्त इतर आजारांवर उपचार होत आहे.  इतर खासगी रुग्णालये कोरोनाव्यतिरिक्त आजारातील रुग्णांवर उपचार करत नसल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कोरोना संकटात कोरोना व्यतिरिक्त ईतर आजार जोडलेल्या रुग्णांवर खासगी रुग्णालयांमध्ये डॉक्टरांनी उपचार करणे बंधनकारक असल्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालायसह देशाचे पंतप्रधान व राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यांनी सर्वच खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांसह रुग्णालय चालक मालकांना दिले आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालायसह केंद्र व राज्यशासनाच्या निर्देशांकडे खासगी रुग्णालये व डॉक्टरांचे पुरता दुर्लक्ष होत आहे त्यामुळे भिवंडीतील रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत असून कोरोना व्यतिरिक्त रुग्णांवर उपचार करण्यास व दाखल करण्यास खासगी रुग्णालये नकार देत असल्याने रुग्णांना रिक्षा व इतर वाहनांमधून रुग्णालयांच्या पायऱ्या झिजविण्यात वेळ गेल्याने रुग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे. दरम्यान कोरोनाव्यतिरिक्त आजारपणातील रुग्णांवर उपचार करण्यासंदर्भात शहरातील सर्व खासगी रुग्णालयांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत अशी प्रतिक्रिया मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ जयवंत धुळे यांनी दिली आहे.