कम्युनिटी किचनच्या कामात हलगर्जीपणा केल्याने भिवंडी आयुक्त, उपायुक्तांना उपविभागीय अधिकाऱ्यांनी बजावली नोटीस

भिवंडी: भिवंडी शहर परिसरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आदेशावरून लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व उद्योग ठप्प झाले आहेत. कामगार वर्गाचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत.

 भिवंडी: भिवंडी शहर परिसरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन आदेशावरून लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व उद्योग ठप्प झाले आहेत. कामगार वर्गाचे मोठ्या प्रमाणात हाल झाले आहेत. त्यांच्यावर व कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच लॉकडाऊनच्या काळात अनेक कामगार बेघर झाले आहेत. परराज्यातील अडकलेल्या कामगारांसाठी तातडीने निवारागृह अन्नधान्य व्यवस्था करावी. तसेच तात्पुरत्या स्वरूपात भिवंडी महानगर पालिकेने उपाययोजना करून कम्युनिटी किचन सुरु करावे, असे आदेश भिवंडीचे उपविभागीय अधिकारी डॉ मोहन नळदकर यांनी पालिका आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर व उपयुक्त दीपक कुरळेकर याना लेखी स्वरूपात दिले होते मात्र पालिका प्रशासनाने शासन आदेशावरून दिलेल्या या पत्राकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले आहे उपविभागीय अधिकारी यांनी आयुक्त व उपायुक्तांना कामात हलगर्जीपणा केल्याबद्दल खेद व्यक्त करीत नोटीस बजावून तातडीने खुलासा करण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे पालिका वर्तुळात एकच खळबळ माजली आहे 

कोव्हीड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावरून मोठ्या प्रमाणात उपाययोजना व धावपळ सुरु आहे. लॉकडाऊन व संचारबंदीमुळे अनेक कामगार कुटुंबांचे हाल होत असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तसेच  परराज्यातील कामगार भिवंडीत अडकले आहेत. या कामगारांनी शासन दरबारी तक्रारी केल्या आहेत. या अनुषंगाने दाखल घेत ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी भिवंडीचे उपविभागीय अधिकारी यांनी महापालिका क्षेत्रातील कामगारांची निवारा व जेवण व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे उपविभागीय अधिकारी डॉ नळदकर यांनी तातडीने महापालिका आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर व उपायुक्त दीपक कुरळेकर यांच्यासह प्रभाग अधिकर्त्यांशी चार वेळा बैठक घेऊन निवारागृह व अन्नधान्य व्यवस्था व प्रभाग निहाय कम्युनिटी किचन तयार करणे व अपेक्षित धान्याची आणि मजूर कामगारांची यादी तातडीने उपविभागीय कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र महानगरपालिका प्रशासनाने उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे उपविभागीय अधिकारी यांनी महापालिका आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर व उपयुक्त दीपक कुर्लेकरांनी कोणतीही माहिती सादर न केल्याने नोटीस बजावली आहे तसेच खुलासा न केल्यास आपत्ती व्यवस्थापन कामात जाणूनबुजून दुर्लक्ष व हयगय करीत असल्याचे गृहीत धरून आपल्यावर शिस्त भगांची कारवाई करण्यात येईल, अशी लेखी नोटीस त्यांनी दिली आहे .