भिवंडीकरांनी स्वच्छतादूतांचा केला सत्कार तर पोलिसांवर पुष्पवर्षाव, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उचलले चांगले पाऊल

भिवंडी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डाॅक्टर्स, नर्स, पोलीस यांच्याप्रमाणेच आपला जीव धोक्यात घालून सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्याचा प्रयत्न करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करणे हे प्रत्येक

 भिवंडी: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डाॅक्टर्स, नर्स, पोलीस यांच्याप्रमाणेच आपला जीव धोक्यात घालून सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्याचा प्रयत्न करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.आजच्या कोरोना महामारीचा धोका ओढवून सफाई कर्मचारी नागरिकांचे आरोग्य सुरक्षित राहावे यासाठी अहोरात्र शहर स्वच्छतेचे काम करीत आहेत.या सेवेची जाणीव ठेवून प्रभाग समिती क्र.१ अंतर्गत येणाऱ्या वार्ड क्र.४ (ड)वेताळपाडा येथील  संभाजी चौक, राकेश छत्रपाल पांडे यांच्या कार्यालयासमोर स्थानिक महिला रहिवाशांनी वार्डातील सर्व सफाई कर्मचारी,आरोग्य निरिक्षक, मुकादम यांची आरती ओवाळून सत्कार केला. अचानक कर्मचाऱ्यांना इतका मान सन्मान मिळाल्यामुळे त्यांचे मन प्रसन्न होऊन ते सर्व या आदरातिथ्याने भारावून गेले आहेत.अशा सत्कारामुळे कर्तव्य पार पाडण्यासाठी एक वेगळीच ऊर्जा निर्माण झाल्याचे आरोग्य मुकादम दिपक धनगर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

तसेच भिवंडी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली फ्लॅग मार्चचे आयोजन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, अजय नगर ,गोकुळ नगर , कोंबडपाडा व आदर्श पार्क या ठिकाणी करण्यात आले होते . या संपूर्ण परिसरात फ्लॅग मार्चमध्ये सहभागी सर्व पोलीस पथकावर महापौर प्रतिभा पाटील , यांनी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांच्या हाती भारतीय ध्वज देऊन तर नागरीकांनी फुले उधळीत त्यांचे स्वागत केले . आदर्श पार्क भागात भूषण रोकडे व परिसरातील नागरीकांनी त्यांचे परंपरागत टोपी घालून औक्षण करून स्वागत केले.यावेळी बहुसंख्य नागरीकांनी रस्त्या कडेला उभे राहून टाळ्या वाजवून ,तर इमारतीच्या खिडकीच्या गॅलरीतून टाळ्या, थाळ्या, शंख वाजवून या पथकाचे स्वागत केले .तर ठिकठिकाणी या पोलीस पथकावर महानगरपालिका कर्मचाऱ्यांकडून सॅनिटायझरची फवारणी होत होती .