भिवंडी महानगरपालिकलेच्या सफाई कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू

भिवंडी: भिवंडीत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत मोठ्या संख्येने वाढ होत असून कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाणदेखील मागील काही दिवसांपासून वाढले आहे. भिवंडी मनपा प्रशासनातील एका सफाई कर्मचाऱ्याचा

 भिवंडी: भिवंडीत कोरोनाबाधित रुग्णसंख्येत मोठ्या संख्येने वाढ होत असून कोरोनाने मृत्यू होण्याचे प्रमाणदेखील मागील काही दिवसांपासून वाढले आहे. भिवंडी मनपा प्रशासनातील एका सफाई कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली आहे. हा कर्मचारी मुख्यालयात सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत होता. मात्र पत्नीच्या प्रसूतीसाठी या कर्मचाऱ्याने काही दिवसांची रजा घेतली होती. यादरम्यान या कर्मचाऱ्याची पत्नी ज्या रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाली होती येथील डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाल्याने या कर्मचाऱ्याची पत्नी देखील कोरोना पॉझिटिव्ह झाली असून तिच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र सफाई कर्मचाऱ्याचा कोरोनाच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. सफाई कर्मचाऱ्याच्या मृत्यूने मनपा प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. तर या मृत्य कर्मचाऱ्याला ५० लाखांच्या विमा कवचासह महापौरांनी घोषित केलेल्या १० लाखांच्या निधीची रक्कम लवकरात लवकर मिळावी, यासाठी कामगार कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त डॉ प्रवीण आष्टीकर यांची भेट घेतली. तसेच मृत सफाई कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत मिळण्यासंदर्भात विनंती केली. आयुक्तांनी त्यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेतली असल्याची माहिती कामगार कृती समितीकडून मिळाली आहे. त्याचबरोबर मनपा कर्मचारी व अधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्यास कर्मचाऱ्यांवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याचे आश्वासन देखील मनपा आयुक्तांनी कामगार कृती समितीला दिले आहेत.