ठाण्यात बर्ड फ्ल्यू आला ; आजपासून शहरातील चिकन शॉपचा सर्व्हे झाला सुरू

सोमवारी काही पक्षी पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिका प्रशासन सतर्क झाली आहे. संदर्भात आयुक्त डॉ. शर्मा यांनी प्रत्येक प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांची तसेच आरोग्य विभागाची तातडीची बैठक घेऊन त्यांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.

  • ठाण्यातील कोंबड्याची होणार तपासणी ; पालिका लागली कामाला

ठाणे : कोरोनाच्या विषाणू नंतर ठाण्यात पक्षी मारण्याच्या सिलसिला सुरू झाला आणि त्यानंतर पॉझिटिव्ह आलेले अहवाल बघता ठाण्यात बर्डफ्लू आला आहे. ठाणे महापालिका चांगलीच कामाला लागली असून आजपासून शहरातील चिकन शॉपच्या सर्व्हेला सुरुवात झाली आहे. सुमारे ६०० हून अधिक चिकन शॉपचा सर्व्हेक्षणाचे काम हाती घेण्यात आले आहे.

महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी प्रत्येक प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांना या संदर्भातील जबाबदारी दिली असून त्यानुसार आजपासून चिकन शॉपमधील कोंबड्याचा सर्व्हे सुरु झाला आहे. यामध्ये कोबंड्यांना काही आजार आहे का?, मृत कोंबड्या कुठे आहेत का? याची पाहणी केली जाणार आहे. तसेच कोंबड्या मृत अवस्थेत आढळल्यास त्यांचे नमुने तपासणी करुन शासनाच्या निर्देशानुसार त्यांची विल्हेवाट लावण्याचे आदेश आयुक्तांनी यावेळी दिले आहेत.

काही दिवसांपूर्वी ठाण्यातील घोडबंदर भागात १६ पक्षाचा मृत्यू झाला, त्यामध्ये पाणबगळे,पोपट,गिधड आणि त्यानंतर कावळ्याच्या देखील समावेश होता. या मृत पक्षांना तातडीने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, दरम्यान सोमवारी काही पक्षी पॉझिटिव्ह असल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिका प्रशासन सतर्क झाली आहे. संदर्भात आयुक्त डॉ. शर्मा यांनी प्रत्येक प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांची तसेच आरोग्य विभागाची तातडीची बैठक घेऊन त्यांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.

त्यानुसार शहरातील चिकन शॉपचा सर्व्हेक्षण करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. या आदेशानंतर तत्काळ दुपार पासून शहरातील सुमारे ६०० चिकन शॉपचा सर्व्हे करण्याचे काम ९ प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकामार्फत सुरु झाले आहे. आतापर्यंत ३५० चिकन शॉपचा सर्व्हे झाला असून उर्वरित सर्व्हे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे.

चिकन शॉप चा सर्व्हे करणारी पहिली महापालिका

कोरोनानंतर बर्डफ्लू सारखा आजार शहरात आल्याने महापालिका कामाला लागली आहे. चिकन शॉपचा सर्व्हे सुरू झाला असून राज्यातील ठाणे महापालिका ही पहिली महापालिका ठरली असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोरोना काळातील ही चिंतेची बाब असली तरी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात येत आहे. प्रत्येकाने आपली काळजी घेणे हेच महत्त्वाचे आहे.

डॉ.विपीन शर्मा ( ठाणे महापालिका आयुक्त )

अद्याप एकही कोंबडी मृत्युमुखी नाही ; पाळीव पक्षी आणि पोल्ट्री फॉर्म वर प्रशासनाचे लक्ष

बर्डफ्लू चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने शहरात सर्व्हे सुरू झाला आहे, आतापर्यंत एकही कोंबडी मृत झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच शहरातल्या पाळीव पक्षी पाळणाऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला असून आजाराची लक्षणे दिसून आली तर लगेच महापालिकेला संपर्क करा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.