ठाण्यात तीन हजार बेड रिकामे असतानाच नव्या हॉस्पिटलचा घाट, भाजपच्या नेत्यांकडून आक्षेप

ठाणे शहरात ३ हजार ६९ बेड रिक्त असतानाही पालिकेकडून व्होल्टास कंपनीच्या जागेवरील १०८५ बेडचे नवे हॉस्पिटल (New Hospital)  सुरू करण्यासाठी घाट घातला जात असल्याने भाजपने आक्षेप घेतला आहे. एका लोकप्रतिनिधीच्या हट्टापायी हा प्रकार घडत असून, त्यामुळे २३ कोटी रूपयांची उधळपट्टी का ? असा सवाल भाजपचे महापालिकेतील गटनेता संजय वाघुले यांनी उपस्थित केला आहे.

ठाणे : ठाणे महापालिकेने (TMC) कोविड रुग्णांसाठी (Covid Patients)  उभारलेले ग्लोबल इम्पॅक्ट हब, भूमिपूत्र हॉस्पिटल पेशंटअभावी रिकामे असून, ठाणे शहरात ३ हजार ६९ बेड रिक्त असतानाही पालिकेकडून व्होल्टास कंपनीच्या जागेवरील १०८५ बेडचे नवे हॉस्पिटल (New Hospital)  सुरू करण्यासाठी घाट घातला जात असल्याने भाजपने आक्षेप घेतला आहे. एका लोकप्रतिनिधीच्या हट्टापायी हा प्रकार घडत असून, त्यामुळे २३ कोटी रूपयांची उधळपट्टी का ? असा सवाल भाजपचे महापालिकेतील गटनेता संजय वाघुले यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे नवीन हॉस्पीटल वादाच्या भोव-यात सापडण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरातील कोविड रुग्णांच्या संख्येत घट होत असून, सध्या केवळ ९४१ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. सध्या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये ९०५, कौसा स्टेडियम येथे ३४१, भूमिपूत्र हॉस्पिटलमध्ये ५७५ बेड रिकामे आहेत. बोरिवडे येथील हॉस्पिटलमध्ये अद्यापि एकही रुग्ण दाखल झालेला नाही. तर ठाणे शहरातील १८ खाजगी रुग्णालयात ७७५ बेड व महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये २२९४ जागा रिक्त आहेत. ठाणे शहरात ३ हजार ६९ बेड रिक्त आहेत. सद्यस्थितीत ठाणे शहरातील ९४१ रुग्णांपैकी २६१ रुग्ण खासगी हॉस्पिटलमध्ये आणि २३८ महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आहेत. मात्र, तीन हजारांहून अधिक बेड रिक्त असतानाही महापालिकेने व्होल्टासच्या जागेवरील हॉस्पिटल सुरू करण्यासाठी लगीनघाई सुरू केली आहे, याकडे गटनेते वाघुले यांनी लक्ष वेधले आहे.

सिडकोच्या १३ कोटींच्या निधीतून व्होल्टास कंपनीच्या जागेवर १०८५ बेडचे हॉस्पिटल उभारण्यात येणार होते. मात्र, या हॉस्पिटलचा खर्च १३ कोटींवरून तब्बल २३ कोटींपर्यंत फुगविण्यात आला. विशिष्ट कंत्राटदारावर मेहेरनजर ठेवण्यासाठी राजकीय दबावापोटी नियमांची पायमल्ली करण्यात आली. आता कोविड रुग्णांची संख्या घटली असताना व महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये बेड रिकामे असतानाही व्होल्टास हॉस्पिटलसाठी कंत्राटदाराला कार्यादेश देण्यात आल्याने वाघुले यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. एकिकडे कोविड रुग्ण घटल्याची माहिती महापालिका प्रशासन मोठ्या कौतूकाने जाहीर करते.

मात्र, महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये २३०० बेड रिक्त असतानाही, नवे १०८५ बेड क्षमतेचे व्होल्टास हॉस्पिटल का उभारले जात आहे. तब्बल २३ कोटी रुपयांचे काम सुरू करण्यासाठी कंत्राटदाराला कार्यादेश देण्यात आला आहे. सत्ताधाऱ्यांच्या दबावापोटी महापालिका प्रशासन किती झुकणार, असा सवालही वाघुले यांनी केला. ठाणे महापालिकेने बाळकूम येथील ग्लोबल हब येथे कोविड रुग्णांसाठी १०२४ बेडचे हॉस्पिटल उभारले आहे. त्यात १५ कोटी खर्चून आणखी ३०० रुग्णांची क्षमता वाढविली गेली. कळवा येथे भूमिपूत्र हॉस्पिटलमध्ये ६४१, कौसा येथील हॉस्पिटलमध्ये ३९४, बुश कंपनीच्या कंपाऊंडमधील रुग्णालयात ४५६ बेडची क्षमता आहे. त्याचबरोबर ज्युपिटर पार्किंग लॉटमधील १३५० बेडचे हॉस्पिटल पूर्ण झाले. तर पाच दिवसांपूर्वी झी व महापालिकेने एकत्रितरित्या बोरिवडे येथे ३०६ बेडचे रुग्णालय कार्यान्वित केले आहे.