शिक्षक- शिक्षकेतरांना वर्क फ्रॉम होम करू द्या – भाजपा शिक्षक सेलची शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

कल्याण : मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करू द्यावे अशी मागणी भाजपा शिक्षक सेलने आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे

 कल्याण : मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करू द्यावे अशी मागणी भाजपा शिक्षक सेलने आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे. याबाबत भाजपा शिक्षक सेल मुंबई विभागाचे संयोजक अनिल बोरनारे यांनी शिक्षणमंत्री,  शिक्षण सचिव व शिक्षण आयुक्तांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.

वित्त विभागाच्या ५ जूनच्या परिपत्रकाचा चुकीचा अर्थ लावीत शिक्षण विभागाकडून शाळांमधील शिक्षक-शिक्षकेतरांची उपस्थिती सुनिश्चित करण्याबाबत सांगितले जात आहे. वास्तविक पाहता या परिपत्रकात शासकीय कार्यालये व शासनाच्या अधिपत्याखाली असणाऱ्या महामंडळांच्या कर्मचाऱ्यांच्या मर्यादित उपस्थितीबाबत आदेश दिले आहे. यामध्ये शाळांचा उल्लेख नसल्यावर देखील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याबाबत सांगितले जात आहे.

मुंबईतील बहुतांश शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी ठाणे, रायगड जिल्हा व नवी मुंबईत राहत असून हे सर्व जिल्हे रेड झोनमध्ये आहेत. लोकल, मेट्रो, व वाहतुकीची साधने बंद असल्याने शाळेमध्ये कसे पोहचणार?  असा प्रश्न शिक्षक-शिक्षकेतरांना पडला आहे. प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्या नसल्या तरी अनेक शाळांमधील शिक्षक विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवीत आहेत. तर शिक्षकेतर कर्मचारी वर्क फ्रॉम होम करून प्रशासकीय कामे करीत आहेत. मग शाळेत बोलविण्याचा अट्टाहास शालेय शिक्षण विभाग कशासाठी करतेय असा प्रश्नही अनिल बोरनारे यांनी शिक्षण विभागाला केला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्क फ्रॉम होम करण्याच्या सूचना केल्या असून त्यांच्याच निर्णयाला छेद देण्याचे काम शालेय शिक्षण विभाग करीत असल्याचा आरोपही अनिल बोरनारे यांनी केला आहे. केंद्राने घोषित केल्याप्रमाणे १५ ऑगस्टपर्यंत राज्यातील शाळा सुरू करण्यात येऊ नये, शिक्षक-शिक्षकेतरांना वर्क फ्रॉम होम करू द्यावे, शाळा बंद असली तरी जिथे शक्य आहे तिथे ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवावे, शिक्षकांना ऑनलाईन शिक्षणाचे प्रशिक्षण द्यावे, ऑगस्टमध्ये शाळा निर्जंतुकीकरण करून घ्याव्यात, कोरोनापासून विद्यार्थ्यांचा बचाव करण्यासाठी शाळांना सॅनिटायझर स्टँड, ग्लोज, मास्क व इतर साधनांसाठी विशेष निधी देण्यात यावा, अशी मागणीही भाजपा शिक्षक सेलने केली असल्याचे भाजपा शिक्षक सेल मुंबई विभागाचे सह संयोजक सचिन पांडे, विजय धनावडे, सुभाष अंभोरे व बयाजी घेरडे यांनी सांगितले.