कोरोना टेस्टच्या नावाखाली त्याने अनेक प्रवाशांना लावला चुना, बोगस टीसीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

रेल्वे प्लॅटफॉर्मवर (Railway platform) प्रवाशांना लुबाडणाऱ्या बोगस टीसीला (bogus TC) रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

    कल्याण : कोरोना टेस्ट आणि त्याच्या अहवालाच्या (Covid Test Report) नावाखाली रेल्वे प्लॅटफॉर्मवर (Railway platform) प्रवाशांना लुबाडणाऱ्या बोगस टीसीला (bogus TC) रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. कल्याण रेल्वे पोलिसांनी (Kalyan Railway Police) ही कारवाई केली आहे.आशिष सोनवणे असे या बोगस टीसीचे नाव आहे. तो कल्याण पूर्वेकडील काटेनवली परिसरात राहणार आहे. विशेष म्हणजे बोगस टीसी असलेला आशिष याच्या नावावर अनेक गुन्ह्यांची नोंद झाली आहे.

    रेल्वे प्रवाशांनी अशा बनावट टीसीपासून सावधान राहावे, असा काही प्रकार आढळल्यास तात्काळ कल्याण रेल्वे पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन कल्याण रेल्वे पोलिसांनी रेल्वे प्रवाशांना केलं आहे.

    कल्याण रेल्वे स्थानकातील ४ नंबर फलाटावर मंगळवारी संध्याकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास कुमार जाधव हे आपल्या पत्नीसह परभणीला निघायला होते त्यामुळे ते लोकलची वाट पाहत बसला होते. इतक्यात त्यांच्याजवळ आलेल्या आशिषने त्यांच्याकडे तिकीटाची विचारणा केली. सदर तरुणाने तिकीट दाखवताच आशिषने त्यांच्याकडे आरटीपीसीआर सारख्या कोरोना टेस्ट केल्याचे सर्टिफिकेट दाखविण्याची मागणी केली. त्यांच्याकडे सर्टिफिकेट नसल्याचे कळताच आशिषने त्यांच्याकडे ३०० रुपयांच्या दंडाची मागणी केली. यामुळे या दाम्पत्याला संशय आल्याने त्यांनी रेल्वे प्लॅटफॉर्मवरील रेल्वे कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्याला पकडून रेल्वे पोलिसांकडे नेले.

    रेल्वे पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा बनावट टीसी असल्याचे निष्पन्न झालं. पोलिसांनी त्याला अटक केली असून न्यायालयात हजर करण्यात आले. त्याच्यावर सुरत पोलीस ठाण्यासह कल्याणमधील विविध पोलीस ठाण्यात सात गुन्हे दाखल आहेत. मात्र अशाप्रकारे बोगस टीसी म्हणून त्याच्यावर हा पहिलाच गुन्हा दाखल आहे. तसेच त्याने यापूर्वी किती गुन्हे केले याचा तपास सुरू असल्याचे कल्याण रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शार्दूल वाल्मिक यांनी सांगितले.