किरगिझस्तानमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

कल्याण : मध्य आशियातील किरगिझस्तानमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भारतातील विद्यार्थ्यांनाही देशात परतण्याची इच्छा असून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी मदतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि

 कल्याण : मध्य आशियातील किरगिझस्तानमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या भारतातील विद्यार्थ्यांनाही देशात परतण्याची इच्छा असून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी मदतीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घातले आहे. किरगिझस्तानमध्ये एमबीबीएसच्या ५ व्या वर्षात शिकणाऱ्या कल्याणातील सानिया पठाण या विद्यार्थिनीने शिवसेनेचे माजी नगरसेवक रवी पाटील यांच्याशी संपर्क साधत मदतीसाठी आवाहन केले आहे.

जगभरात अडकलेल्या भारतीय नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने तयारी सुरू केली असून संबंधित नागरिकांकडून त्याचे शुल्क घेण्यात येणार आहे. मात्र मध्य आशियातील किरगिझस्तानमधील ओएचएस स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये शिकणाऱ्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनाही भारतात परतण्याची इच्छा आहे. परंतु या विद्यार्थ्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती पाहता मायदेशात परतण्यासाठी द्यावे लागणारे शुल्क आम्हाला परवडणारे नसल्याचे सानिया पठाणने सांगितले. तसेच परदेशात अडकलेल्या व्यक्तींच्या भारत सरकारच्या यादीमध्ये किरगिझस्तानचा उल्लेख आहे की नाही याबाबत इथल्या भारतीय दुतावासाकडे (एम्बसी) कोणतीही माहिती नसल्याचे तिने सांगितले. दरम्यान एकंदर सर्व परिस्थिती पाहता सानियासह महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना राज्य सरकारने मदत करून मायदेशी आणावे यासाठी शिवसेनेचे माजी नगरसेवक रवी पाटील हे प्रयत्न करत असून यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा सुरू असल्याचेही पाटील यांनी सांगितले.