कोरोनाचा प्रभाव कमी झाला, पण संपलेला नाही हे लक्षात ठेवून सण साजरे करा ; महापौरांचे ठाणेकरांना आवाहन  

ठाणे : कोरोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी तो संपलेला नाही, हे लक्षात ठेवून सण साजरे करा असे आवाहन ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी ठाणेकरांना केले आहे. दिवाळी सण देखील लगेच आहे याची आठवण करून देत विजयादशमीच्या ठाणेकरांना शुभेच्छा देताना त्यांनी सोशल मिडीयातून हे आवाहन केले आहे.

दसरा हा सीमोल्लंघनाचा सण आहे. आपल्‍याला अनेक विषयांवर सीमोल्लंघन करायचे आहे.  ठाणे महानगरपालिका असो… राज्‍य शासन असो.. करोनावर विजय मिळवण्‍यासाठी सर्वोतोपरी प्रयत्‍न करीत आहे.  महानगरपालिकेच्या सूचनांना ठाणेकर जनता देखील  उत्‍तम प्रतिसाद देत आहे, ठाण्यातच नव्हे तर देशात नावलौकीक प्राप्त केलेला टेंभीनाक्याचा नवरात्रोत्सव हा देखील ठाणेकरांनी  नियमांचे पालन करून साजरा केला, असेच सहकार्य कायम ठेवा. आपल्‍या सर्वांना करोनारूपी रावणाचे उच्‍चाटन करायचे आहे.  शहराचा प्रथम नागरिक या नात्‍याने मी तमाम ठाणेकरांना आवाहन करतो की,करोनाचा प्रभाव कमी झाला असला तरी तो संपलेला नाही हे लक्षात ठेवून सण साजरे करा.  आपल्‍याला उज्‍ज्वल ठाण्‍याचा दिपस्‍तंभ प्रज्‍वलित ठेवायचा आहे. काळजी घेऊन पावित्र्यांचा सण साजरा करू असे आवाहन महापौरांनी  केले आहे.