मध्य रेल्वे मार्गावर ट्रॅक रेलिंग ट्रेनला अपघात, दुर्दैवाने एकाचा मृत्यू

अंबरनाथ ते बदलापूरच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच वाहतूक सेवा दोन ते तीन तासांनंतर सुरूळीत होणार असल्यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागणार आहे.

ठाणे: अंबरनाथ-बदलापूर रेल्वे स्थानकादरम्यान ट्रॅक रेलिंग ट्रेनला अपघात झाल्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक आज सकाळपासून विस्कळीत झाली आहे. या स्थानकांत खडी टाकण्याचे काम करणारी मशीन रेल्वे रूळावरून घसरून अपघात झाला आहे. परंतु दुर्दैवाने या घटनेत एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. तसेच मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून प्रवाश्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याची घटना आज (बुधवार) सकाळी घडली आहे. अंबरनाथ ते बदलापूरच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे. तसेच वाहतूक सेवा दोन ते तीन तासांनंतर सुरूळीत होणार असल्यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खडी टाकणारी मशिन रूळावरून घसरल्यानं आणि मेंटेनन्स मशिन बंद पडल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच ही मशिन बाजूला करण्याचं काम सुरू आहे. त्यानंतर रेल्वे वाहतूक पूर्ववत होणार आहे.